स्थानिक शेतकरी आणि सर्व राजकीय नेत्यांच्या समन्वयाने बारसू येथील रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी समन्वयाची एक बैठक मे महिन्याच्या प्रारंभी होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवार पत्रकार परिषदेत दिली.
सामंत यांनी शनिवारी बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सामंत यांनी बैठकीविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, चर्चेला बारसूचे आंदोलक तयार आहेत, असे समजल्यानंतर शनिवारी तातडीने रत्नागिरीत बैठक आयोजित केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींनी बैठक नंतर घ्यावी, अशी सूचना केली. त्यानंतर येत्या २ किंवा ३ तारखेला मुंबईत समन्वयाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
रिफायनरीसाठी प्रशासन बळाचा वापर करत असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. पण तसे काहीही नाही. प्रतिबंधक कारवाई म्हणून ताब्यात घेतलेल्या महिलांना शुक्रवारीच मुक्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी चार पावले अधिक पुढे टाकत आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल दोन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेले ३५३ सारखे कलम लावले जाणार नाही, असे जाहीर केले आहे. प्रकल्पाच्या परिसरात शासकीय अधिकाऱ्यांनीही जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. प्रमाणाच्या बाहेर खरेदी झाली आहे का, याबाबतची चौकशी दोन दिवसांत केली जाईल. अधिकाऱ्यांनी अशी जमीन खरेदी केली असेल, तर त्याला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याच्या नावे अशी जमीन खरेदी केली गेली असेल, अशा अधिकाऱ्याची बदली मुख्यालयात केली जाईल.
(हेही वाचा – Barsu Refinery : … तरच सरकारशी चर्चा; सत्यजित चव्हाण यांचा इशारा!)
पुढे सामंत म्हणाले, शुक्रवारच्या बैठकीला खासदार विनायक राऊत, अजित यशवंतराव उपस्थित होते. तेही आंदोलकांशी संवाद साधत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांची वेळ घ्यावी. त्यांच्याशी जिल्हाधिकारी, आयुक्त बोलून त्यांच्या शंकांचे निरसन करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनाही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे. सर्वांच्या शंकांचे निरसन केले जाईल. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा शासनाचा प्रयत्न नाही.
सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती देताना सामंत म्हणाले, सध्या परीक्षणासाठी जे उत्खनन केले जात आहे, तेथे पिलर तयार केले जाणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात तसे काहीही मातीपरीक्षणाचा तो भाग आहे. ते झाल्यानंतर त्याचे निष्कर्ष येतील, तेव्हाच प्रकल्प तेथे येणार की नाही, हे ठरणार आहे.
आतापर्यंत सर्वांशी संयमाने चर्चा झाली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, प्रकल्प विरोधक सत्यजित चव्हाण यांच्याशीही एका लाइव्ह कार्यक्रमात चर्चा झाली आहे. सरकारला हा प्रकल्प रेटून पुढे न्यायचा नाही. सर्वांच्या शंका दूर करून आणि शेतकऱ्यांना न्याय देऊनच प्रकल्प पुढे न्यायचा आहे. जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा गैरसमज पसरला जात आहे, असेही सामंत म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community