Mann Ki Baat: मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’चे आयोजन

222
Organizing 'Mann Ki Baat' program at 5 thousand places in Mumbai
Mann Ki Baat: मुंबईत ५ हजार ठिकाणी 'मन की बात'चे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाच्या १००व्या पर्वासाठी मुंबई भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजाराहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. अलीकडेच ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षणानुसार ‘मन की बात’ (Mann Ki Baat) १०० कोटी श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहे. ‘मन की बात’चे २३ कोटी नियमित श्रोते आहेत. ९६ टक्के लोकांना या कार्यक्रमाबाबत माहिती आहे, त्यांनी एकदा तरी हा कार्यक्रम ऐकला आहे. देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची माहिती मागवून त्यांच्या कार्याचा सन्मान देखील या माध्यमातून करण्यात आला आहे.

देशासाठी काम करणाऱ्या पण प्रसिध्दीपासून लांब असलेल्या अनेकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. श्रोत्यांना सरकारच्या कामाची जाणीव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याचा विश्वास सामान्य नागरिकांना वाटतो आहे. अनेकांनी राष्ट्र उभारणीच्या कामात पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या अभिनव आणि कलात्मक पद्धतीने गेल्या काही वर्षांत लोकप्रियतेचे सर्व मापदंड मागे टाकले आहेत. यातून पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्यात विलक्षण नाते तयार झाले आहे. जनतेच्या भावनेचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटते असेही आशिष शेलार म्हणाले. त्यामुळे रविवारी, २९ एप्रिलला प्रसारित होणाऱ्या शंभराव्या भागाची सगळ्यांना उत्सुकता आहे. मुंबईत खासदार, आमदार आणि पक्ष पदाधिकारी मुंबईत ठिकठिकाणी आपापल्या विभागातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

‘मन की बात’चे (Mann Ki Baat) असे होतील कार्यक्रम

आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व ३६ विधानसभेत प्रत्येकी १०० कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागाठाणे विधानसभेत घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृहउद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लिम महिला, रिक्षाचालक यांना कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते या सर्व कामगार वर्गाचा गौरव करण्यात येणार आहे. दहिसर विधानसभेत आमदार मनीषाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. भाजप मुंबई युवा मोर्चातर्फे नवीन युवा मतदारांना खास आमंत्रित केले जाणार आहे. ओबीसी मोर्चाच्यावतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने शीर खुर्मा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि उर्दू शाळांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

(हेही वाचा – काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

भाजपा लीगल सेलतर्फे वकिल बांधवांच्या उपस्थितीत ईशान्य मुंबईत कार्यक्रम होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आघाडीकडून खास मुंबईतील डबेवाल्यांसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दक्षिण भारतीय सेलने वरळीतील महिलांसाठी विशेष कार्यक्रम आखला आहे. उत्तराखंड सेलकडून २०० नागरिक पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संयुक्त महाराष्ट्र दालनात कामगार आघाडीचा विशेष कार्यक्रम होईल. भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे आधार कार्ड, मतदार कार्डसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभा क्षेत्रानुसार होणारे कार्यक्रम

बोरिवली १५१, दहिसर ३०८, मागाठाणे १३०, कांदिवली पू. ४००, चारकोप १४०, मालाड प. १५०, जोगेश्वरी पू. ९०, दिंडोशी १३५, गोरेगाव १८०, वर्सोवा १३५, अंधेरी प. १८०, अंधेरी पू. १२०, मुलुंड १००, विक्रोळी १६०, भांडुप प. १५०, घाटकोपर प. ७०, घाटकोपर पू. ९०, मानखुर्द शिवाजीनगर १२०, विलेपार्ले २००, चांदीवली १४०, कुर्ला २००, कलिना १३१, वांद्रे पू. १२५, वांद्रे प. १२०, अनुशक्ती नगर १००, चेंबूर १००, धारावी १२५, सायन कोळीवाडा १५०, वडाळा १००, माहीम १००, वरळी १००, शिवडी १००, भायखळा १००, मलाबार हिल १००, मुंबादेवी १००, कुलाबा १०

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.