शिवसेनेने भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार काही भाजपच्या खासदारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेताना दिसत नाही. पूर्व उपनगरातील चांदिवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी तर भाजपसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामे रद्द तथा स्थगित करायला लावून एकप्रकारे मनमानी कारभाराला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे रद्द करणे किंवा स्थगित करण्याच्या आमदारांच्या भूमिका पटण्यासारखी असली तरी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्येही अशाप्रकारची भूमिका लांडे यांनी घेतल्याने एकप्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आमदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदार फुटल्यानंतर त्यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. या शिवसेनेमध्ये चांदिवली विधानसभा मतदार संघातील आमदार दिलीप लांडे हेही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहेत. चांदिवलीतील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार असलेल्या दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव करत विजय मिळवला. लांडे यांचा विजय केवळ ४०९ मतांनी झाला होता. परंतु लांडे यांच्या विजयात भाजपची भूमिका महत्वाची होती. पण भाजपसोबत फारकत घेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आमदार लांडे यांनी भाजपचे तत्कालीन नगरसेवक हरिष भांदिग्रे यांच्या विकासकामांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भांदिग्रे आणि लांडे यांच्यातील वाद सर्वश्रुत बनला होता.
परंतु शिवसेना फुटल्यानंतर लांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने प्रवेश केल्यानंतर भाजप सोबत असलेल्या पक्षाच्या युतीमुळे ते आता त्यांच्याशी जुळवून घेतील, असे वाटत होते. परंतु शिवसेना आणि भाजप यांची युती असूनही लांडे हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेत नसल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा – महापालिकेच्या ‘या’ विभाग कार्यालयाने वाचवले ५ हजार विजेचे युनिट; महिन्याला वाचतात सुमारे ४२ हजार रुपये)
उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये विकास कामांसाठी निधीची तरतूद केली. या जिल्हा नियोजन निधीतून केल्या जाणाऱ्या कामांचे श्रेय आणि श्रीफळ वाढवणे आदी कामे केवळ आपल्याच हस्ते व्हायला पाहिजे अशा दम लांडे यांनी अधिकाऱ्यांना भरुन भाजपच्या माजी नगरसेवकांची मुस्कटदाबी केली. याची तक्रार भाजपचे खासदार पुनम महाजन यांच्याकडे केल्यानंतरही त्यांना या आमदारांनी जुमानले नाही. त्यांनीही या मतदार संघात विशेष लक्ष घालणे सोडल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच विधानसभा अध्यक्ष हेही लांडे यांच्या कार्यपध्दतीला कंटाळले असून या मतदार संघात भाजपचे सक्रीय असलेले नगरसेवक हरिष भांदीग्रे यांच्या विकासकामांमध्येही त्यांनी पुन्हा अडवणुकीची भूमिका घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची कामे न करण्याची तंबी दिल्याचीही माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक १६४ मधील सुंदरबाग येथील लक्ष्मी मेडिकल ते राजे शिवाजी मंडळपर्यंत, नौपाडा येथील लिंगराज सेवा मंडळ ते डॉन बॉस्को स्कूल कंपाऊंडपर्यंत, रेल्वे कारशेड कंपाऊंड, रामदेव पीर मार्ग तसेच साळवी चाळ येथील मुख्य पर्जन्य जलवाहिनीचे कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. ही कामे स्थानिक आमदारांच्या सुचनेमुळे विलंब झाल्याची चर्चा विभागात ऐकायला मिळत आहे. हा प्रभाग भाजपचे माजी नगरसेवक हरिष भांदीग्रे यांचा असून त्यांच्याप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विजय शिंदे आणि सोमनाथ सांगळे यांच्य प्रभागातील कामांनाही आमदारांनी खिळ लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदारांच्या या एकाधिकारशाहीला युतीतील भाजपसह प्रतिस्पर्धी पक्षातील पदाधिकारीही हैराण झाले असून भाजपशी युती होऊनही लांडे यांच्या स्वभावात बदल न झाल्याने लांडे यांना आगामी निवडणूक कठीण जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community