राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षासोबत युती करत भाजपने सरकार स्थापन केले असले तरी प्रत्यक्षात सत्तेचा लाभ भाजपच उठवत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह इतर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री असलेले भाजपचे आमदार हे पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईमध्ये उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे सरकार आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत मुंबईतील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये जनता दरबार आयोजित करत आहेत. परंतु त्यातुलनेत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेनेकडून कोणताही प्रयत्न होत नसून सत्तेचा पुरेपूर वापर करत गल्लीबोळापर्यंत पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे भाजप जोमात असून शिवसेना मात्र कोमात असल्याने सध्या पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत ८२ जागांवर नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपने आगामी महापालिका निवडणुकीत १५० नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी भाजपची रणनिती आखली जात असून मुंबईतील प्रत्येक प्रभागांमधील घराघरांमध्ये भाजपचे काम पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईची बांधणी करणाऱ्या भाजपने राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर सत्तेचा योग्यवापर करून जनतेच्या मनामध्ये आपले कार्य आणि काम बिंबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राज्यातील भाजपचे आमदार असलेलेले मंगलप्रभात लोढा हे महिला व बालविकास मंत्री असून उपनगराचे पालकमंत्री आहेत. तर शिवसेनेचे आमदार असलेले दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री तसेच शहराचे पालकमंत्री आहेत. परंतु पालकमंत्री पदाचा योग्य वापर भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सुरू असून आजवर उपनगरांमधील प्रत्येक प्रभागांमधील महापालिकेच्या विकासकामांचा आढावा बैठकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि जनतेसोबत घेणाऱ्या लोढा यांनी शहरातील महापालिकेच्या कार्यालयांमध्येही महिला व बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
(हेही वाचा – चांदिवलीत भाजपा शिवसेनेचे सुत जुळेना: आमदारांच्या कारभारामुळे भाजपसह शिवसेनेचे पदाधिकारी त्रस्त)
शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे असतानाच लोढा यांनी शहरांमधील महापालिकेच्या कार्यालयांमध्ये महिला व बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी असा उपक्रम राबवत आहे. विशेष म्हणजे शहरांमध्ये अशाप्रकारचा कार्यक्रम राबवताना पालकमंत्री म्हणून केसरकर यांनी उपस्थित राहणे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदयांनी कार्यक्रम करणे आवश्यक आहे. परंतु युतीमध्ये सत्ता असली तरी भाजप शिवसेनेला जुमानत नसून आगामी महापालिका निवडणुकीत १५० नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
भाजप मुंबईमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत असताना शिवसेनेच्यावतीने शहराचे पालकमंत्री म्हणून ना केसरकर काही कार्यक्रम राबवत ना पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून काही प्रयत्न केले जात. केसरकर हे सावंतवाडीचे आमदार असून त्यांना मुंबईशी काही पडलेले नाही आणि शिवसेनेचे लक्ष ठाण्याकडे असल्याने त्यांना मुंबईचे काही पडलेले नाही. त्यामुळे मुंबई भाजपला देऊन ठाणे शिवसेनेकडे राखण्याच्या दृष्टीकोनातून युतीचे प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. मुंबईमध्ये शिवसेनेला मजबूत करण्यासाठी मुंबईतील आमदाराला किंवा पक्षातील मुंबईतील नेत्याला मंत्री बनवून त्यांच्यामार्फत पक्षाचे संघटन वाढवण्या प्रयत्न होऊ शकतो. मुंबईमधील मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव आमदारांमधून कुणाची मंत्रीपदी वर्णी लावायची नसल्यास शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते किरण पावसकर यांची मंत्रीपदी वर्णी लावून त्यांना शहराचे पालकमंत्री बनवल्यास त्यांच्या माध्यमातून मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, असेही बोलले जात आहे. सरवणकर हे मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असले तरी त्यांची मंत्रीपदी काही वर्णी लागत नाही. पण सरवणकर मंत्री बनल्यास ते पालकमंत्री बनू शकतात आणि सरवणकर पालकमंत्री बनल्यास ते शहरांमध्ये योग्य कार्यक्रम राबवून पक्षाला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community