मोडी लिपिच्या संवधर्नासाठी आणि ती जनमाणसांत रुजण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, जागतिक मोडी लिपि प्रसार समिती, शिवराज्याभिषेक समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनी, सोमवारी, १ मेला ‘मोडी लिपि स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये एकाचवेळी आणि एकाच दिवशी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा तसेच मोडी लिप्यंतर स्पर्धा संपन्न झाली. मोडी लिपिच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे यंदा हे सातवे वर्ष आहे.
मुंबईत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सोमवारी सकाळी ‘मोडी लिपि स्पर्धा’ संपन्न झाली. दोन भागात ही स्पर्धा झाली. एक सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि दुसरी मोडी लिप्यंतर स्पर्धा. मुंबईत झालेल्या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान मोडी लिपिच्या प्रचारासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रशिक्षणाचे वर्ग चालवले जातात. या वर्गाचे प्रशिक्षक सुनील कदम आणि पंकज भोसले आहेत.
(हेही वाचा – Maharashtra Day : उद्धव ठाकरे यांनी वाहिली हुतात्मांना आदरांजली)
सोमवारी झालेल्या ‘मोडी लिपि स्पर्धे’निमित्ताने प्रशिक्षक सुनील कदम म्हणाले की, ‘मोडी लिपिही साडे सातशे वर्षांपूर्वीची आहे. हेमाद्री पंडित यांनी प्रचलित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो काही पत्रकार व्यवहार केला गेला. लेखन व्यवहाराची जी लिपि होती, राजलिपि ती मोडी लिपि होती. म्हणून शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई आणि इंग्रजांच्या काळातला काही काळ सुमारे १९५२ पर्यंत जे काही सरकार आणि खासगी कागदोपत्री व्यवहार झाले ते मोडी लिपित लिहिले जात होते. त्याच्यामुळे इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला ही कागदपत्र वाचावी लागतात, पण त्याकरता मोडी येणे गरजेचे असते. आता मोडी विस्मृतीमध्ये गेली आहे. आणि त्यामुळे तिला पुनर्जीवित करणे आणि संवर्धन करणे हे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली मोडी लिपि असे म्हणता येईल.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community