बारसू रिफायनरी प्रकल्प: सरकारची पवारांशी चर्चा, उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष

219
बारसू रिफायनरी
बारसू रिफायनरी प्रकल्प: सरकारची पवारांशी चर्चा, उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष

बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामुळे रान पेटलेले असतानाच सरकारने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु या प्रकल्पाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने आंदोलन तीव्र केले जात असले तरी सरकारच्यावतीने उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी न बोलता सरकार मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्याशीच चर्चा करत आहे. त्यामुळे सरकारच्या लेखी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची काहीही किंमत नसून शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करून तसेच त्यांच्या विचारानेच हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे बारसुमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आंदोलन करत असले तरी त्यांना खिजगिणतीतही न धरता सरकारने पवारांशी चर्चा करून यावर तोडगा काढत एकप्रकारे ठाकरेंचे महत्व कमी करून पवारांचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.

कोकणातील राजापूर तालुक्यातील सोलगाव बारसू परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियमन उद्योग हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित असून या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यास सुरुवात झाली. याला स्थानिक गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. या माती परिक्षणावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये दोन दिवसांपासून वाद सुरु आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने पाठिंबा देत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहे. परंतु या आंदोलनाला खतपाणी घालून स्थानिक रहिवाशांचे आंदालन तीव्र करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंमत न देता आता सरकारने महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्याशीच बारसू प्रकरणात चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार सोमवारीही उदय सामंत यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपण मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शरद पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यावेळी पक्षाचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. स्थानिकांचे शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे स्थानिकांच्या सूचना पवार यांच्याकडून जाणून घेत याबाबत तोडगा काढण्याचा सूचना केल्या आहेत. कोणत्याही परिस्थिती शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा न करता हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही असा शब्द शरद पवार यांना शासनाने दिला असल्याचे सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भेटले नसून महाविकास आघाडीचे नेते म्हणून भेटले आहेत. त्यामुळे बारसू प्रकल्पाला मोठ्याप्रमाणात विरोध करणाऱ्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोणीही नेते नसून शरद पवारांना सोबत घेऊन हा प्रकल्प सरकार स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढे घेऊन जात आहेत. परंतु या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना सरकार मात्र कोणतीही किंमत देत नसून पवारांना विशेष महत्व देत एकप्रकारे उद्धव ठाकरेंचे आणि त्यांच्या गटाचे महत्व कमी केले जात आहे. पवारांच्या माध्यमातून सरकार उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देत असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे.

(हेही वाचा – Barsu Refinery: बारसू रिफायनरीसंदर्भात शासनाच्यावतीने शरद पवारांना दिला ‘हा’ शब्द)

राज्यामध्ये शिवसेना हा पक्ष हा सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष होता. परंतु या पक्षाची दोन छकले पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी बनवून आगामी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. पण आता ठाकरेंचे राज्यातील महत्व आता कमी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी राष्ट्रवादी पक्ष मोठा असून शरद पवार हेच सर्वेसर्वा आहेत. पवारांना विचारात घेऊन सरकार काम करत असल्याने ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनाची तीव्रताही कमी होत आहे. त्यामुळे बारसुमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाची एकप्रकारे सरकार दखल घेत नसून पवारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाची हवाच निघून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वांत जास्त जागा आल्या असून त्याखालोखाल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळवता आल्या आहेत. परंतु महाविकास आघाडीतील मोठा पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वांत कमी जागा मिळाल्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष फायदा उठवत असून या महाविकास आघाडीचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तेवढा होताना दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षच अधिक उठवत असल्याचे दिसून येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.