राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) ४० आमदारांसह भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांच्याबद्दलच्या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही आहेत. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानावरून पुन्हा एकदा पवार यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘योग्य वेळी निवडणूका घेऊ आणि’ … देवेंद्र फडणवीस यांचं माविआच्या टीकेला उत्तर)
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट जनतेपर्यंत आपली भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ (Vajramuth Sabha) सभा सोमवार १ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाषणं केली. तेव्हा अजित पवार यांनी नाव न घेता नितेश राणे यांच्यावर टीका केली.
हेही पहा –
या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मंगळवार २ मे रोजी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे यांनी “काल उद्धव ठाकरे आणि अजित दादांनी (Ajit Pawar) माझ्या पत्रकार परिषदांचा उल्लेख केला. तसं म्हटलं तर अजित दादांना सगळंच माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. पण उद्धवजींना मी सांगेन तुमच्यावर बोललं तर तुम्हाला झोंबतं, पण तुमच्या सकाळच्या भोंग्याचं (संजय राऊत) काय?” अशा भाषेत उत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community