‘मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार’ असल्याची मोठी घोषणा शरद पवारांनी केली आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचे शरद पवार म्हणाले. ‘लोक माझे सांगाती राजकीय आत्मकथा’ या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवारांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला, शरद पवारांना हा निर्णय मागे घेण्यास सांगितला. जोपर्यंत निवृत्तीचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असे कार्यकर्त्यांनी पावित्रा घेतला आहे. यावेळी सर्व कार्यकर्ते भावूक होऊन शरद पवारांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत. सभागृहात सध्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. शरद पवारांना चहूबाजूने कार्यकर्त्यांनी घेरून भावनिक साद घालत आहेत. हे कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून यावेळी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार नक्की काय म्हणाले?
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मंगळवारी, २ मेला ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी आपल्या भाषणात शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतल्याचे जाहीर केले. यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘कुठे थांबायचे हे मला कळते. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’
धनंजय मुंडेंनी शरद पवारांचे पाय धरले
शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला. त्यांनी शरद पवारांच्या या निवृत्तीला जोरदार विरोध केला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे पाय धरले. राष्ट्रवादीची जी समिती नेमली आहे, ती समिती जो निर्णय घेईल ते पवारांना मान्य असेल, असे यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community