मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मंगळवारी, २ मेला ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा यावेळी शरद पवारांनी केली. पण कार्यकर्त्यांनी हा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद घालून सभागृहात एकच गोंधळ घातला. यामुळे कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत समिती निर्णय घेईल, असे सांगितले. पण समिती वगैरे आम्हाला काही मंजूर नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी थेट विरोध केला.
अजित पवार काय म्हणाले?
‘तुमच्या सर्वांच्या भावना शरद पवारांना कळल्या आहेत. शरद पवारांनी सांगितले आहे की, ‘जी काही समिती आहे, त्या समितीने एकंदरीत लोकांचा काय कौल आलेला आहे, ते लक्षात घेऊन पुढच्या गोष्टी ठरवाव्यात. आणि समिती जे ठरवेल तर मला मान्य असल्याचे सांगितले.’ त्यामुळे आता माझी विनंती आहे की, समिती म्हणजे कुठलीही बाहेरची लोकं नाहीयेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या कुटुंबातील लोकं आहेत. आम्ही पण काही दुसरे बाहेरचे नाहीयेत. तिथे मी असले, सुप्रिया असेल बाकीचे सगळे असू. तुमच्या मनातला समिती निर्णय घेईल, एवढीच खात्री मी देईन,’ असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची शरद पवारांची घोषणा)
छगन भुजबळ काय म्हणाले?
यावर छगन भुजबळ म्हणाले की, ‘तुम्ही तुमचं वय आमुक तमुक सांगता, आम्हाला काही मंजूर नाही. या वयामध्ये तुम्ही आमच्या कोणापेक्षाही दसपट काम करता. आणि आज या पक्षाला, देशाला, राज्याला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. अशा वेळेला तुम्ही असा निर्णय घेणं, हे आम्हालाच काय देशातल्या कोणाही व्यक्तीला मान्य नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की, हा राजीनामा ताबडतोब मागे घ्यावा. आणि हे सगळेजण आहेत, ते आयुष्यभर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले आहेत, तसे वागले आहेत. तुमच्यासोबत चाललो आहोत. सुखात-दुखात तुमच्यासोबत आम्ही राहिलो आहोत. अशावेळी आम्ही कसं काय तुम्हाला बाजूला बसून देऊ शकतो. आणि आम्ही आपलं काहीही करा. समिती वगैरे आम्हाला काही मंजूर नाही.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community