मालाड स्टेशनजवळील दुकाने तोडली; पण चार दिवसांनंतरही डेब्रीज तिथेच, रस्ता वाहतुकीसाठी बंद

204
मालाड स्टेशनजवळील दुकाने तोडली; पण चार दिवसांनंतरही डेब्रीज तिथेच, रस्ता वाहतुकीसाठी बंद
मालाड स्टेशनजवळील दुकाने तोडली; पण चार दिवसांनंतरही डेब्रीज तिथेच, रस्ता वाहतुकीसाठी बंद

मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्थानक रोड वरील दुकानांचे वाढीव बांधकाम तोडून अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतरही तब्बल तीन दिवसांपासून याचे डेब्रीज या रस्त्यावर पडलेले असून यासाठी वाहतुकीचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरील दुकानांचे बांधकाम तोडण्यात आल्यानंतर येथील डेब्रीज तात्काळ हटवणे आवश्यक असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हे राडारोडा उचलला न गेल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तब्बल चार दिवस उलटून गेले तरी हा रस्ताच या डेब्रीज अभावी बंद ठेवण्यात आल्याने येथील रस्त्यांची रुंदी वाढवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ही कारवाई केली असली तरी या कारवाईनंतरही लोकांना आणि रेल्वे प्रवाशांना या सुविधेऐवजी बंद असलेल्या या रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मालाड (पश्चिम) मधील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ, आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी १९ दुकाने पी-उत्तर विभागाने शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी पाडली. मालाड (पश्चिम) मध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकाबाहेरील आनंद मार्गाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी कृत्रिम दागिन्यांची बाजारपेठ आणि मासळी बाजार असल्याने याठिकाणी दररोज किमान १ लाख २० हजार नागरिकांची वर्दळ असते. उपनगरीय स्थानकाला लागून असलेल्या या परिसरातील बांधकामांमुळे रस्त्यावर नागरिकांची चालताना मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, पी-उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. कारवाईत मालाड मधील एमएम मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रस्त्याची रुंदी १३.४० मीटर झाली आहे. त्यामुळे या कारवाईमुळे सुमारे १५ ते २० फूट रस्ता रुंद करणे शक्य झाले आहे. या कारवाईमुळे रस्ता रुंद करून, वाहतूक सुरळीत करण्यासह नागरिकांनाही रस्त्याचा सुलभपणे वापर करणे शक्य होणार असल्याचा विश्वास पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केला होता.

(हेही वाचा – महापालिकेचे डॉ. संजीव कुमार यांची बदली; श्रवण हर्डीकर नवे अतिरिक्त आयुक्त)

शुक्रवारी ही कारवाई झाल्यानंतर त्यानंतर मंगळवारपर्यंत रेल्वे स्थानकाजवळील हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरुन बेस्टच्या दोन बसेस सुटल्या जातात. परंतु ही कारवाई झाल्यापासून या मार्गावरील बेस्ट बससह इतर वाहनाची वाहतूक पूर्णपणे बंद असून नागरिकांनाही चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथील डेब्रीज हटवण्यासाठी संस्थेची नेमणूक झालेली आहे. परंतु हे डेब्रीज हटवल्यास पुन्हा त्याठिकाणी फेरीवाले बस्थान मांडतील. त्यामुळे या अतिक्रमण तोडलेल्या आणि बॉटल नेक काढलेल्या भागातील रस्त्यासह पदपथाचे काम करण्यासाठीही संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे, हे काम लवकरच सुरू होईल. हे काम पुढील दहा ते बारा दिवसांमध्ये पूर्ण होईल. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर येथील डेब्रीजही हटवले जाईल. या रस्त्याचा आणि पदपथाचा विकास झाल्यानंतर स्थानिक जनतेला वाहतूक कोंडीची समस्या सहन करावी लागणार नसून पदपथावरुन मोकळेपणाने चालता येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.