बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
‘भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगाव येथे प्रचाराला आलो होतो. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात प्रभारी होते. तेही सर्वत्र फिरले आहेत. मी स्वत: मराठी भाषिकांच्या मागे उभा आहे आणि आमचा पक्ष सुद्धा ठामपणे उभा आहे. संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. त्यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रचार कुठे करा आणि कुठे करू नका, याबाबत सांगितले नाही. कारण, ते येथे काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते,’ असेही फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा – ‘मुख्यमंत्री म्हणून मी काय केलं हे जगजाहीर’; उद्धव ठाकरेंचे शरद पवारांना उत्तर)
बेळगावातील प्रचार सभांमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘बेळगावात आणि कर्नाटकातही कमळच फुललेले दिसेल. गेल्या ९ वर्षांत देशात मोठे परिवर्तन झाले आहे. गरिबांसाठी दिल्लीतून जाणारा प्रत्येक पैसा पूर्णपणे गरिबांच्या खात्यात जात आहे. दलाली आणि मध्यस्थांची संपूर्ण यंत्रणा संपविण्याचे काम मोदीजींनी केले. भारताला जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविण्याचे काम मोदीजींनी केले. मूठभर लोकांच्या तिजोरीत असलेला पैसा देशाच्या तिजोरीत आल्याबरोबर देशात झालेले परिवर्तन तुम्ही अनुभवत आहात.’
जागतिक पातळीवर सुद्धा भारताची ताकद निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. ३७० कलम रद्द करुन देशाला सुरक्षित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. विरोधी पक्षांनी फक्त एकच काम केले, ते म्हणजे त्यांच्या सरकारांनी मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही, तरीही काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. बजरंग दलावर बंदी टाकायची कुणाच्या बापाची हिंमत नाही. डोक्याला गंध लागले तर ते पुसायचा अट्टाहास काँग्रेसच्या अध्यक्षांकडून केला जातो. काँग्रेसच्या सत्तेच्या मनसुब्यांना आग लावण्याचे काम मतांच्या रुपाने तुम्हाला करावे लागेल. रामाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्यांना त्यांची जागा दाखविण्याची ही वेळ आहे. आमची संस्कृती, भारतमाता, प्रभू श्रीराम ही आमची अस्मिता आहे. त्यावर कुणी प्रश्नचिन्ह निर्माण करीत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community