स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांच्या बरोबर ज्यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ते वामन जोशी यांचे चरित्ररूपी पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथील म.शु. औरंगाबादकर सभागृहात संपन्न झाला. ‘त्रिपणातील एक पर्ण’ असे नाव असलेले पुस्तक लेखिका शरयु प्रकाश कुलकर्णी यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून सेल्युलर जेलमध्ये वि.दा. सावरकर, बाबाराव सावरकर आणि वामन नारायण जोशी या महाराष्ट्रातील तीन क्रांतीकारकांना झालेल्या यातना आणि काही गोष्टी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. क्रांतिकारकांच्या चरित्राचे अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी क्रांतिकारकांच्या चरित्राचे अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे म्हणाले की, वामन जोशी यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील समशेदपूर होते, परंतु नाशिकशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. १९०९मध्ये जेव्हा नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध झाला, त्यावेळी त्या कटाच्या संदर्भात वामन जोशी यांना अटक झाली होती. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर आणि वामन जोशी यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. वामन जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीचा ९ वर्षांचा काळ अंदमानात घालवला. त्यांनी कोलू फिरवला आणि अंदमानात जे अनन्वित छळ होत होते त्याला तोंड दिले. या चरित्रात एक प्रसंग आला आहे की, वामन जोशी यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांनी कोलू फिरवण्यास नकार दिला, त्यावेळी तेथील ब्रिटिश पोलिसांनी त्यांना शिवी दिली. वामन जोशी इतके संतापले कि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्याच्या मुस्कटात मारली. हे फार मोठे धाडसाचे कृत्य होते, त्यानंतर सगळे पोलीस वामन जोशी यांच्यावर तुटून पडले. त्यांना मारहाण झाली. वामन जोशी किती स्वाभिमानी होते, धाडसी होते, हेच यावरुन आपल्याला लक्षात येते, असे डॉ. पिंपळे म्हणाले.
Join Our WhatsApp Community