कुणाला माहित आहे मौलाना महंमद उमरजी? कुणाला माहित आहे जयंती भाई गोयल आणि रमेश भाई गोयल, सगळे नकारार्थी उत्तर देतील. पण स्टॅन स्वामी कोण विचारले तर सगळे ‘हो’ म्हणतील. मौलाना महंमद उमरजी हा माणूस गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे, आज तो निर्दोष बाहेर आहे, कुणीही त्यावर बोलत नाही. कुणालाही माहित नाही. गोध्रा हत्याकांडानंतर त्यांची प्रतिक्रिया गुजरातमध्ये उमटली आणि दंगली झाल्या. मूळ गोध्रा हत्याकांडातील आरोपी निर्दोष सुटतो, कुणाला याची कल्पना नाही. त्याचवेळी जयंती भाई गोयल आणि रमेश भाई गोयल कारागृहात त्यांचा मृत्यू होतो. हे दोघे बेस्ट बेकरी प्रकरणातील आरोपी होते. गोध्रानंतर झालेल्या दंगलीतील हे आरोपी होते. त्यांना सत्र न्यायालय, उच्च न्यायालय निर्दोष सोडते; पण तिस्ता सेटलवाड या तथाकथित मानवाधिकार कार्यकर्त्या यांनी आकांडतांडव केला आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेल्या, हा अन्याय आहे म्हणाल्या. आयोगानेही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयात जात या प्रकरणावर सुनावणी घेण्याची मागणी केली.
न्यायालयानेही तातडीने सुनावणी घेवून खटला पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला, तोही मुंबई न्यायालयात चालविण्यास सांगितले आणि हा खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरु झाला तेव्हा न्यायमूर्ती ठिपसे न्यायाधीश होते. त्यांनी हा खटला सुरु केला, पुढे तो पुन्हा उच्च न्यायालयात गेला तिथेही न्यायमूर्ती ठिपसे यांच्यासमोर हे प्रकरण आले. न्या. अभय ठिपसे यांनी हे प्रकरण पुन्हा चालू ठेवले, निवृत्तीनंतर हेच न्या. ठिपसे काँग्रेसमध्ये गेले. या प्रकरणात पुढे ४ जण दोषी ठरले पण हे दोघे जण न्यायाच्या प्रतीक्षेत राहिले, कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, शेवटी त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला.
मालेगाव बॉम्बस्फोटात शाम साहू नावाचे संशयित होते, त्यांना अटक केली जेव्हा त्यांना न्यायालयात उभे केले तेव्हा त्यांनी पाहिले तिथे साध्वी प्रज्ञा सिंग आणि अन्य जणांना आरोपी म्हणून उभे केले होते, हे पाहून त्यांना इतका धक्का बसला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. कुणीही या गोष्टी समोर आणल्या नाहीत.
(हेही वाचा – वीर सावरकरांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले माहिममधील दत्त मंदिर तोडण्याचा डाव)
आता आपण स्टॅन स्वामी प्रकरणाविषयी बोलू. बेस्ट बेकरीसारख्या गोष्टी बारकाईने पाहिल्या जातात, पण अन्य प्रकरणात दुर्लक्ष केले जाते. स्टॅन स्वामी हे ख्रिश्चन धर्म प्रचारक होते, ते भीमा कोरेगाव येथे सभेला कसे जातात, तिथे निदर्शने कसे करतात? कुणीही यावर प्रश्न विचारत नाहीत. हा ख्रिस्ती प्रचारक पकडला जातो आणि एनआयए म्हणते त्याच्या विरोधात पुरावे आहेत, मग हा कुठला दहशतवाद आहे? कुणी प्रश्न विचारला नाही. पुढे त्यांच्या मृत्यूवर जोरदार चर्चा होते, त्यांना कोरोना झाला होता, त्यांना ख्रिस्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मग कोण त्यांच्या संपर्कात आले होते? कुणीही प्रश्न विचारत नाही. त्यावेळी त्यांना भेटायला दुसरा पाद्री आला होता, त्याने स्टॅन स्वामीसोबत फोटो काढला आणि तो व्हायरल केला होता. तेव्हा स्टॅन स्वामी जामिनावर नव्हते ते कस्टडीत होते, मग अशा वेळी दुसरा कुणी पाद्री कसा काय स्टॅन स्वामी यांना भेटू शकतो? याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे का? कुणीही यावर प्रश्न विचारत नाही.
म्हणूनच ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ सारखी पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे, अशी अधिकाधिक पुस्तके प्रकाशित झाली पाहिजेत. अशा पुस्तकांमुळे प्रश्न विचारण्याची हिंमत होते. नक्षलवादी हे कम्युनिस्ट आहेत, त्यांनी ४० हजार जणांची आतापर्यंत हत्या केल्या आहेत. त्यावर का कुणी प्रश्न विचारत नाहीत. त्यावर कुणी काही बोलत नाहीत. म्हणून भीमा कोरेगाव, बेस्ट बेकरी अशा प्रकरणांवरही अशी पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे.
(लेखक हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community