इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल तोंडावर आलेला असताना परीक्षेतील गैरप्रकाराचे एक-एक प्रकरण समोर येत आहे. इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आढळून आल्याच्या कारणावरून शेकडो विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने पाचारण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ३२० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आढळून आला आहे. दररोज ८० विद्यार्थ्यांची बोर्डात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी चार दिवस चालणार आहे.
बारावीच्या परीक्षेनंतर आता उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आढळून आले आहेत. यामुळे याप्रकरणी बोर्डाने विद्यार्थांना पाचारण केले आहे. पहिल्या दिवशी पाचारण केलेले विद्यार्थी हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी आणि तेथीलच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांची वर्ग -२ च्या अधिकार्यासमोर सुनावणी होत आहे. पहिल्याच दिवशी ८७ विद्यार्थी बोर्डासमोर सुनावणीसाठी दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांसोबतच पालकही आल्याने विभागीय कार्यालयात आज गर्दी आढळून आली. सुनावणीसाठी आलेल्या काही विद्यार्थी आणि पालकांशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. विभागीय बोर्डाचे अचानक महाविद्यालयाला पत्र आले. त्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आणि शाईबदल दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांनी संबंधित उत्तरपत्रिकेवरील बदल झालेले अक्षर आमचे नाही, असे बोर्डाच्या अधिकार्यांना सांगितले. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर वेगवेगळे मजकूर लिहून ठेवले असल्याचेही निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी मोबाइल क्रमांक वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेला आढळून आला आहे. उत्तरपत्रिकेच्या तपासणीत काही विद्यार्थ्यांच्या लेखनात प्रश्नपत्रिकेशी संबंधित मजकुराऐवजी अन्य बाबी आढळून आल्या आहेत.
(हेही वाचा Karnataka Election : मतदानाच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांचे जनतेला पत्र )
Join Our WhatsApp Community