महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये रुग्णांची डिजिटल आरोग्य माहिती

208
महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये रुग्णांची डिजिटल आरोग्य माहिती
महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये रुग्णांची डिजिटल आरोग्य माहिती

आरोग्यसेवा क्षेत्राला ‘ऑनलाइन’ व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात ‘आयुष्मान भारत डिजिटल मोहीम’ सुरू केली आहे. या ‘ऑनलाईन’ व्यासपीठावर आरोग्यविषयक नोंदींसह आरोग्यसेवेची माहिती अगदी सहज मिळू शकणार आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागदेखील या डिजिटल उपक्रमात सहभागी झाला असून, ‘पाथ’ (PATH) या संस्थेच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहे. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती व उपचारविषयक नोंदी या ‘आभा’च्या संगणकीय प्रणालीत नोंदवून आयुष्मान भारत डिजिटल उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी कळविले आहे की, भारताच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ (एबीडीएम) हा उपक्रम हाती घेतला आहे. आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक (आभा), आरोग्य क्षेत्रातील व्यवसायिकांच्या नोंदी (एचपीआर), आरोग्य सुविधा नोंदी (एचएफआर) आणि ‘आभा अप्लिकेशन’ आदी महत्वपूर्ण बाबी आणि त्यावर आधारित सुविधांचा यात समावेश आहे.

रुग्णांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर

‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ याअंतर्गत ‘आयुष्मान भारत आरोग्य कार्ड’ (आभा कार्ड) वितरण प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. त्यासाठी रुग्णांची संपूर्ण माहिती ‘आयुष्यमान भारत’शी जोडण्यात येत आहे. यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर पाहू शकतील. यासाठी देशातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र सुविधा आहे. यामुळे रुग्णांवरील उपचाराचे पुढील नियोजन, तपासण्यांचा प्रत्येक अहवाल या व्यासपीठावर सहज उपलब्ध होऊ शकेल. रुग्ण कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा या योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात गेल्यास तेथील डॉक्टर अवघ्या काही क्षणात त्याच्या आरोग्याचा तपशील पाहून उपचाराची दिशा ठरवू शकतील, असेही डॉ. मंगला गोमारे यांनी कळविले आहे.

रुग्णांची डिजिटल माहिती संकलित..

महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या डिजिटल उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाला आहे. यासाठी ‘पाथ’ या संस्थेच्या मदतीने महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये पथदर्शी उपक्रम राबवित आहे. आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेअंतर्गत खासगी वैद्यकीय व्यवसायिक आणि सुविधांची नोंदणी केली जात आहे. आरोग्य व्यावसायिक आणि सुविधांची अनुक्रमे ‘एचपीआर’ (Health Care Professionals Registry) आणि ‘एचएफआर’ (Health Facility Registry) या घटकांनुसार नोंदणी करण्याात येत आहे. त्यामुळे ‘आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (Health Management Information System) द्वारे रुग्णांची डिजिटल माहिती संकलित करण्यास गती मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर) तयार करण्यासही मदत होणार आहे.

(हेही वाचा – खडी अभावी रस्त्यांची कामे थांबली नाहीत: प्रशासनाचा दावा)

१ हजार वैद्यकीय व्यावसायिकांनी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेत नोंदणी

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी आणि तांत्रिक सहाय्य देण्यासाठी विभागस्तरावर सत्रे आणि भेटींचे आयोजनही महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पथदर्शी उपक्रमास सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत १२ सत्रे झाली आहेत. त्याद्वारे ३ हजार ५०० खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. त्यापैकी १ हजार वैद्यकीय व्यावसायिकांनी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेत नोंदणी केली आहे. तर, २ हजार २५० वैद्यकीय व्यायवसायिकांनी सहभागी होण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच ८५० वैद्यकीय व्यावासायिक ‘इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ तयार करण्यासाठी या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

डिजिटल आरोग्य व्यवहारांना चालना…

आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचा आवाका वाढविण्यासाठी आणि डिजिटल आरोग्य व्यवहारांना चालना देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. खासगी वैद्यकीय व्यायायिकांनी आयुष्मान भारत डिजिटल मोहीम प्रणाली स्वीकारावी, यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने डिजिटल प्रोत्साहन योजनाही सुरू केली आहे. ही योजना एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी, स्वतःची नोंदणी करणाऱ्या खासगी व्यावसायिकांना किमान निकषांची पूर्तता करावी लागेल. किमान निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच यासंदर्भातील लाभ मिळू शकतील. सर्व खासगी व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी तयार करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेच्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी यानिमित्ताने केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.