महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप आणि नैतिकतेचा संबंध नाही, असे म्हणत भाजपवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत चांगलाच टोला लगावला आहे.
नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शरद पवारांच्या टीकेवर प्रसार माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवारांचा नैतिकतेशी संबंध आहे का? आता जर पवारांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली, तर कठीणच जाईल. मग इतिहासात जावे लागेल. वसंतदादांच सरकार कसे गेले इथपासून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ठिक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात. फार लक्ष द्यायचे नसते.
(हेही वाचा – Maharashtra Political Crisis: ‘रणांगण सोडणाऱ्यांना न्यायालयसुद्धा वाचवू शकत नाही’)
‘अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाही’
तसेच पुढे फडणवीस म्हणाले की, ‘१६ आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार अतिशय स्पष्टपणे अध्यक्षांना दिला आहे. वाजवी वेळही सांगण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर ते फ्री अँड फेअर अशाप्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही अध्यक्ष कोणत्या दबावाला बळी पडतील. अध्यक्ष जे आहेत, ते अत्यंत निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे, जे संविधानात आहे, जे कायद्यात आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष निर्णय करतील. योग्य सुनावणी देऊन योग्य वेळेत निर्णय करतील, अशी माझी अपेक्षा आहे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community