कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसने बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळला आहे. यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी डबल इंजिन रुळावरून घसरल्याचे म्हटले. या विजयामध्ये मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी खूप परिश्रम घेतले. काँग्रेसच्या सर्व नेतृत्वाने यात आपल्याला झोकून दिले आणि या विजयात सर्वांचा सिंहाचा वाटा आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्रातीलही अनेक सहकारी तिकडे जाऊन आले आहेत. या मतदानात काँग्रेसच्या मतांचा टक्काही वाढला आहे. काँग्रेसच्या जागा भाजपपेक्षा दुपटीने अधिक दिसत आहेत. काँग्रेसची मतांची टक्केवारी ४३ पर्यंत पोहचली. भाजपची मताची टक्केवारी तितकीच राहिली आहे. अनेक स्तरातून काँग्रेसला पाठिंबा मिळाला आहे, हे उघड आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. भाजपने अनेक ठिकाणी ध्रुवीकरण, तृष्टीकरण करून राजकारण कसे करता येईल हे पाहिले. जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मागे पडल्याचे त्यांना दिसले, तेव्हा शेवटचे हत्यार म्हणून देवधर्म आणण्याचा विषय झाला. देवधर्म हे व्यक्तीगत आस्थेचे विषय आहेत. राजकारणाचे विषय ते होऊ शकत नाही हे कर्नाटकाच्या लोकांनी दाखवून दिले आहे, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community