महापालिकेडून नाल्यातील काढलेल्या गाळाची आकडेवारी जी देण्यात येते आहे, ती आणि प्रत्यक्षातील चित्र याच्यामध्ये तफावत आहे. त्याचे कारण कंत्राटदराने दिलेली आकडेवारी प्रशासन सांगते आहे. म्हणून जी आकडेवारी कंत्राटदाराने दिली आहे त्याची महापालिका प्रशासनाने फेर तपासणी करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली.
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील काही नाल्यांची पाहणी केल्यानंतर शनिवारी पूर्व उपनगरातील नालेसफाईचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, आमदार तमिल सेलवन, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, समिता कांबळे, प्रकाश गंगाधरे, राजेश्री शिरवडकर, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदींसह भाजपा पदाधिकारी आणि सबंधित पालिका अधिकारी सहभागी झाले होते.
आज सकाळी मुलूंड तांबे नगर येथील नाल्यापासून दौऱ्याला सुरुवात झाली. रामगड, एपीआय, उषा नगर, ऑक्सीजन, लक्ष्मीनगर, माहूल आणि जे.पी. केमीकल नाल्याची पाहणी आमदार ऍड.आशिष शेलार यांनी केली. यातील बहूसंख्य ठिकाणी नुकतीच कामाला सुरुवात झाली होती तर अजून ही गाळाचे ढीग नाल्यात दिसून येत आहेत. प्रत्येक ठिकाणी काढण्यात आलेला गाळ आणि प्रत्यक्षातील चित्र हे अधिकाऱ्यांसोबत पडताळणी करुन आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आजचा दुसरा दिवस असून दोन्ही दिवशी आम्ही. जे चित्र पाहिले त्यावरून प्रशासनाने सांगितलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये तफावत दिसतेय. कंत्राटदारांनी जी आकडेवारी दिली तीच पालिका प्रशासन सांगतेय. म्हणून याची फेरतपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष किती गाळ काढला, वजन काट्यावर किती मोजला, डंम्पींगवर किती टाकला या सगळ्याची फेरतपासणी प्रशासनाने करावी तरच या कामात पारदर्शकता येईल. गेली अनेक वर्षे जे कंत्राटदार उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मर्जीतील म्हणून काम करत होते, त्याच कंत्राटदारांंकडून ही कामे केली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटांचे नगरसेवक, नेते, आदित्य ठाकरे हे सगळे सफाईकामाची पाहणी करायला नाल्यावर यायला तयार नाहीत. ते कंत्राटदारांनी दिलेल्या आकड्यांवर समाधान व्यक्त करत आहेत. त्यावर आमचा विश्वास नाही. म्हणून प्रशासनाने फेरतपासणी करावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली.
- मुंबई शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे मेजर नाला सफाई आर्थिक तरतूद ८१.३२ कोटी
- पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग सफाई आर्थिक तरतूद १५ कोटी,
- मिठी नदी सफाई आर्थिक तरतूद ८७ कोटी,
- छोटे नाले सफाई आर्थिक तरतूद १०३ कोटी रुपये
- एकूण नाले सफाईसाठी आर्थिक तरतूद २८६ कोटी रुपये