सरकारच्या विरोधात चिथावणीखोर बोलणे तसेच पोलिसांची प्रतिमा समाजामध्ये खराब करणे या कारणामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. अशातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधिमंडळाची प्रतिमा खराब केल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
(हेही वाचा – CBIची मोठी कारवाई; समीर वानखेडेंसह NCBच्या अधिकाऱ्यांचे फोन जप्त)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावरून विधानसभा अध्यक्ष हे सर्व पक्ष फिरून आलेले आहेत. त्यांना याच्यातले काही कळत नाही किंवा त्याने चुकीचा निर्णय दिला तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते.
त्यांच्या या विधानामुळे विधानसभा अध्यक्ष आणि पर्यायाने विधानसभेचा अपमान होत असल्याने संजय शिरसाट यांनी हक्कभंग दाखल केला आहे.
हेही पहा –
संजय शिरसाट यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून, आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करीत आहेत. (Sanjay Raut)
Join Our WhatsApp Community