कर्नाटकाच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र आता हायकमांडला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. कारण कर्नाटकाच्या विजयात काँग्रेसच्या दोन नेतृत्वाची भूमिका आहे. एक म्हणजे सिद्धरामैय्या आणि डिके शिवकुमार. या दोघांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला आहे. पण निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस झाले, तरी अद्याप काँग्रेसला मुख्यमंत्री ठरवता आला नाही.
सिद्धरामैय्या आणि शिवकुमार यांच्या नावावर पक्षात दोन गट पडले आहेत. सध्या दोन्ही नेते दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी असून, पक्षश्रेष्ठींची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या दोन नेत्यांच्या निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांची मते भिन्न आहेत. राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामैय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर सोनिया गांधी डीके शिवकुमार यांच्या बाजूने आहेत. यामुळे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करुनच ते एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत. सिद्धरामैय्यांसोबत बहुतांश आमदार कर्नाटकातील विजयाचे श्रेय शिवकुमार स्वतःला देत आहेत, पण बहुतांश आमदार सिद्धरामैय्या यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते रणदीप सुरजेवाला दोन्ही नेत्यांबाबत तटस्थ आहेत. या सर्व गोंधळादरम्यान, पक्षाध्यक्ष खरगे दोन्ही नेत्यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. या बैठकीत या दोन्ही नेत्यांची मते जाणून घेतली जातील. दरम्यान, या दोघांशिवाय कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते जी परमेश्वरा यांनीही स्वतःला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या हायकमांडने सरकार चालवण्यास सांगितले तर ते जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे परमेश्वरांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्या पक्षसेवेची हायकमांडला जाणीव असल्याने त्यांना या पदासाठी लॉबिंग करण्याची गरज वाटत नाही, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा G-20 : तुर्कीची काश्मीरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय Y20 बैठकीत हजेरी; पाकिस्तानचा जळफळाट)
Join Our WhatsApp Community