World High Blood Pressure Day : उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व योगा करा

सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित ह्दयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ वाटणे, ही उच्च रक्तदाबाबची लक्षणे आहेत.

279
उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जीवन शैलीशी निगडीत आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित योगा आणि व्यायाम करावा, असे आवाहन मुबंई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने, १७ मे रोजीच्या ‘जागतिक उच्च रक्तदाब दिना’निमित्त केले आहे.
सध्याच्या धावपळीच्या व बदलत्या जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या रक्तदाब व मधुमेह अशा आजारांबाबतही सातत्याने जाणीव जागृती मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येते.लठ्ठपणा, आहारातील मीठाचा अतिवापर, धुम्रपान व मद्यपान, ताण-तणाव आणि कोलेस्ट्रॉलच्या अतिउच्च पातळीमुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडण्याची शक्यता असते. परंतु, योग्य उपचार पद्धती आणि जीवनशैलीत बदल केले तरे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रोजच्या आहारातील मीठाचे प्रमाण ५ ग्रॅम पेक्षा कमी ठेवा, पुरेशी झोप व विश्रांती घ्या, आहारात फळे, भाज्या व कमी चरबीयुक्त अन्नाचे सेवन करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रक्तदाबाची नियमित तपासणी करा असे आवाहन  महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित ह्दयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ वाटणे, ही उच्च रक्तदाबाबची लक्षणे आहेत. मुंबईतील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची लक्षणे असलेल्या रूग्णांचे वेळीच निदान होऊन या रूग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय औषधोपचार मिळावेत, यासाठी  महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ४ जानेवारी २०२३ पासून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी आरोग्य सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने मुंबई उपनगरांसह झोपडपट्ट्यांच्या भागात लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात घरोघरी भेट देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे स्क्रीनिंग केले जाते. या सर्वेचा सध्या १९ वा टप्पा पूर्ण झाला आहे.

जागरूकता आणि योग्य औषध-उपचारांवर भर

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रूग्णांचे वेळीच निदान होऊन त्यांना प्रभावी उपाचार मिळावेत यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन नागरिकांची पूर्व तपासणी करणे, त्यांच्यामध्ये जागरूकता करणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचार पद्धतीचा अवलंब करणे तसेच रूग्णांकरिता दक्षता आणि देखरेख प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून या रूग्णांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण १५ रूग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू केली आहेत. येथे रूग्णांची तपासणी व पाठपुरावा करून त्यांना पुढील रूग्णालयात संदर्भीत करण्यात येते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.