Veer Savarkar : भाषाशुद्धीचा आग्रह धरणाऱ्या वीर सावरकरांच्या जन्मस्थळी भगूर नगरपालिकेकडून मराठीचे वाभाडे 

भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घराबाहेरील पालिकेच्या दिशादर्शक फलकात अक्षम्य चुका आहेत.

253

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेल्या कार्यामध्ये मराठी भाषाशुद्धीचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मात्र त्याच वीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथे याच मराठी भाषेचे वाभाडे भगूर नगरपालिकेने काढले आहेत. या ठिकाणी पदपथावर जे दिशादर्शक फलक लावले आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचे अशुद्ध लिखाण करण्यात आले आहे. हे पाहून सावरकरप्रेमी संतप्त झाले आहेत. या संबंधीची पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेला येत आहे.

भगूर येथे नगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकामध्ये चुकलेले नाव तातडीने नव्याने बदल करून त्यात सुधारणा केली जाईल, यात कुठलाही विलंब केला जाणार नाही.
– निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी, भगूर नगरपालिका. 

भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घराबाहेरील पालिकेच्या दिशादर्शक फलकात अक्षम्य चुका आहेत. वीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख करताना त्यात ‘वीर’ हा शब्द ‘विर’ असा अशुद्ध लिहिला आहे. तसेच ‘पालीका, भगुर’ हे शब्द चुकीचे लिहिले आहेत. त्यात ‘पालिका’ आणि ‘भगूर’ असा योग्य शब्द अपेक्षित आहे. मराठी भाषेतील अक्षम्य चुका पाहून सावरकरप्रेमी नाराज झाले आहेत. आमोद दातार यांनी याविषयीचे केलेले ट्विट सध्या जोरदार चर्चेत आले आहे. त्यामध्ये दातार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचे ट्विटमध्ये नमूद केले आहे. मात्र ‘यावर कार्यवाही करण्यात आली आहे’, असे उत्तर देण्यात आले आहे, पण १७ मेपर्यंत यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.  त्यामुळे निदान वीर सावरकरांच्या १४० व्या जन्मदिनापर्यंत अर्थात २८ मे पर्यंत तरी यात सुधारणा करणे शक्य असेल तर करावे, असे दातार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा swatantryaveer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृती पुरस्कार घोषित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.