कर्नाटकच्या विजयानंतर बारा हत्तींचे बळ संचारलेल्या कॉंग्रेसच्या एकजुटीच्या प्रयत्नाला जबरदस्त धक्का बसला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल नकार दिला आहे. विरोधकांची वज्रमूठ बांधण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नाला हा जबरदस्त धक्का असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे.
राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याच्या कॉंग्रेसच्या स्वप्नांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरजण सोडले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहण्यासाठी दीदींना आमंत्रण पाठविले होते. त्या आल्या तर विरोधकांची एकजूट उमटून दिसेल असे खरगे यांचे म्हणणे होते. परंतु, एकेकाळच्या रालोआच्या घटक पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसचा हा प्रस्ताव सपशेल नाकारला आहे. महत्वाचे म्हणजे दीदींनी कॉंग्रेसचा प्रस्ताव नाकारण्याची ही दुसरी वेळ होय. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’च्या समापन समारंभातही उपस्थित राहण्याचे निमंत्रण दीदींना पाठविण्यात आले होते. दीदींनी हेही निमंत्रण नाकारले होते, हे येथे विशेष.
सिद्धरामय्या यांचा शपथविधी 20 मे रोजी होणे आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी दीदींनी काकोली घोष यांना नेमले आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वत: उपस्थित न राहता आपल्या माणसाला पाठविले आहे. यामुळे विरोधकांच्या एकजुटीचा पोळा फुटला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसला त्या जागांवर पाठिंबा देईल जेथे पक्ष मजबूत स्थितीत आहे. थोडक्यात, ममता बॅनर्जी कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला पुढे जावू देण्यास तयार नाहीत.