शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कार्यरत असणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांचे रिपोर्टकार्ड तयार करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. त्याचा एकत्रित अहवाल ते केंद्राला सादर करतील. त्यानंतर कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांचे खाते बदलले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रीपदी विराजमान झाल्यापासून कोण कोणत्या नव्या योजना सुरू केल्या, त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे, पक्ष संघटनेशी समन्वय साधून त्या तळागाळात पोहोचवण्यासाठी कोणते प्रयत्न केले, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी किती हातभार लावला, याचा लेखाजोखा यानिमित्ताने घेतला जाणार आहे. हे रिपोर्टकार्ड तयार करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याच्या खात्याला स्वतंत्र पीए देण्यात आला आहे. तो हे रिपोर्टकार्ड भरून पाठवणार आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचा एकत्रित अहवाल केंद्राला सादर करतील. त्यानंतर कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांचे खाते बदलले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मे महिन्याच्या अखेरीस हा विस्तार होऊ शकतो. त्यात २१ जणांना संधी दिली जाणार आहे. विद्यमान मंत्रिमंडळात समाधानकारक कामगिरी न करणाऱ्यांकडील खाते काढून त्या जागी नवा मंत्री दिला जाईल, असे कळते.
(हेही वाचा J. P. Nadda : मंत्रिमंडळ विस्ताराला जे.पी. नड्डांकडून हिरवा कंदील; ‘या’ नावांची चर्चा)
मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी
- कर्नाटक निवडणूक निकालानंतर सतर्क झालेल्या भाजपाने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, राज्य मंत्रिमंडळातील स्वपक्षाच्या मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, भाजपाचे सर्व ९ मंत्री दर शुक्रवारी राज्यातील एकेका जिल्ह्याचा दौरा करतील आणि संघटनात्मक बांधणीवर भर देतील.
- या मंत्र्यांनी दिलेल्या जिल्ह्यात शुक्रवारी संपूर्ण दिवस विविध कार्यक्रम घ्यावेत. त्यापैकी किमान सहा तास संघटनात्मक कामकाजाकरिता राखीव ठेवावे आणि उर्वरित वेळ शासकीय कामकाजासाठी द्यावा. प्रवास पूर्ण झाल्यावर लगेच प्रवासाचा सविस्तर अहवाल प्रदेश भाजपाकडे पाठवावा, अशी सूचना करण्यात आली आहे.