BMC : परळ टीटी उड्डाणपुलावरून दुचाकी आणि अवजड वाहनांना नो एंट्री; येत्या १ जूनपासून फक्त हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळी कामांमध्ये उड्डाणपुलांच्या देखभालीच्या कामांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्या निर्देशानुसार सुरूवात झाली आहे.

273

मुंबई पूर्व उपनगर ते शहर यामधील महत्वाच्या दुवा असणाऱ्या परळ टीटी उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पांशन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या १ जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे. केवळ चारचाकी हलक्या वाहनांना प्रवेश असेल, असे पूल विभागाने स्पष्ट केले.

दुचाकी, अवजड वाहनांना उड्डाणपुलावर प्रवेशबंदी

परळ टीटी उड्डाणपुलावर पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सुरूवात झाली आहे. याठिकाणी अवजड वाहनांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत खड्डे पडण्याचा अनुभव येतो. म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी या उड्डाणपुलावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी विनंती महानगरपालिकेच्या पूल विभागाला केली होती. अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई वाहतूक पोलिसांकडून मिळाले आहे. त्यामुळेच परळ टीटी उड्डाणपुलाच्या आधी आठवड्याभराच्या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणारा हाईट बॅरियर लावण्यात येणार आहे. याठिकाणी २.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. फक्त हलक्या वाहनांना या उड्डाणपूलावरून प्रवेश असेल.

सद्यस्थितीत पुलाच्या प्रसरण सांध्याचा भाग वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे पुलाचे सक्षमीकरण होत नाही, तोवर दुचाकींसाठी हा उड्डाणपूल वाहतूकीच्या दृष्टीने सुरक्षित नाही. या उड्डाणपुलासाठी हाईट बॅरिकेट लावण्यासाठी विभागीय पातळीवर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ मे पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे पूल विभागाकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा Azad Maidan Riot : तपासातील कुचराईमुळेच दंगलखोर मुसलमानांची हिंमत वाढली)

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळी कामांमध्ये उड्डाणपुलांच्या देखभालीच्या कामांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्या निर्देशानुसार सुरूवात झाली आहे. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच उड्डाणपुलाचा पर्याय किमान खर्च आणि वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून ऑक्टोबरमध्ये ब्रीजच्या सक्षमीकरणासाठीचे काम उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. तर ३१ मे पर्यंत उड्डाणपुलाची सर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण होतील, असा विश्वास पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी सांगितले.

वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पुलावर दुरूस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार याठिकाणी खड्डे भरणे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पूल विभागाने व्यक्त केला आहे.

ऑक्टोबरपासून उड्डाणपुलाचे सक्षमीकरण

महानगरपालिकेच्या डिलाईल रोड (लोअर परळ) उड्डाणपुलाचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लोअर परळच्या उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टीटी उड्डाणपुलाचे काम हाती येत्या ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी पुलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठीचे कार्यादेश पूल विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनीही ऑक्टोबरपासून या पुलाच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. याठिकाणी एक सॉलिड रॅम्प टाकून सध्याच्या उड्डाणपुलावर नव्या मार्गिकांचा पर्याय वाहन चालकांना मिळेल. पुलाच्या सक्षमीकरणासाठी खालच्या बाजुच्या पोकळीच्या जागा भराव टाकून भरण्यात येणार आहेत. साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी या कामासाठी अपेक्षित आहे. तर १८ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च या उड्डाणपुलाच्या कामासाठी येणार आहे. विद्यमान उड्डाणपुलाच्या पायाचा आधार घेऊनच नव्या उड्डाणपुलाचा सॉलिड रॅम्प स्थिर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवा उड्डाणपूल बांधण्याचा खर्च आणि वेळ वाचविणे महानगरपालिकेच्या रस्ते विभागाला शक्य होणार आहे. सक्षमीकरणाच्या प्रकल्पानंतरच अवजड वाहनांना या उड्डाणपुलावरून पुन्हा प्रवेश देण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.