देशाची शान असलेल्या संसदेची नवीन इमारत राजधानीत मोठ्या दिमाखात तयार झाली आहे. मात्र सुरुवातपासूनच विरोधकांनी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर काँग्रेससह सर्व विरोधक बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारने केवळ निवडणुकीचा फायदा लाटण्यासाठी दलित व आदिवासी समुदायाच्या व्यक्तीची राष्ट्रपतीपदी नियुक्ती केल्याचे दिसते. खरगे पुढे म्हणाले की, २८ मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले, तर त्यातून सरकारची लोकशाही मूल्ये व घटनात्मक शिष्टाचाराची बांधिलकी दिसून येईल. यासोबतच बिहारचे नितीशकुमार यांनी देखील विरोध दर्शविला आहे.
तर नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच झाले पाहिजे. मात्र, त्यांनाच आता या इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याचे समोर आले आहे. लोकशाहीसाठी ही अतिशय गंभीर बाब आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकावर केली आहे. तसेच, नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास ठाकरेंची शिवसेनाही बहिष्कार घालेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community