केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर २५वा रँक आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यावेळी कश्मिराने तिच्या या यशामागील रहस्यही आणि प्रवासही सांगितला.
कश्मिरा संखे म्हणाली, ‘या निकालाकडून काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. मात्र, आशा नक्कीच होती. जेव्हा निकाल लागला तेव्हा काही वेळ विश्वास बसत नव्हता. ही प्रोव्हिजनल लिस्ट नसून रँकर्स लिस्ट आहे ना याची मी खात्री करून घेतली, तेव्हा मला विश्वास बसला की माझा देशात २५ वा रँक आहे. लहानपणापासून मी यूपीएससीचे स्वप्न पाहिले होते. माझी आई मला किरण बेदींच्या बातम्यांची कात्रणे दाखवायची. तेव्हापासून नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याचा विचार होता. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. मी मुंबईतील शासकीय डेंटल कॉलेजमधून डेंटल सर्जरीमध्ये पदवी घेतली. पुढे डेंटिस्ट म्हणून काम करत असताना वाटले की, मी नागरिकांच्या आरोग्यावर काम करते आहे, मात्र नागरी सेवेतून मी मोठ्या प्रमाणात काम करू शकते. तेव्हापासूनचा निश्चय आताही ठाम आहे, असे कश्मिरा संख्येने सांगितले.
(हेही वाचा NCC : ‘एनसीसी’च्या विस्तारासाठी राज्यशासनाकडून सहकार्य मिळणार; विद्यार्थीसंख्या ६० हजारांनी वाढणार)
मी २०२० पासून या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. हा माझा तिसरा प्रयत्न होता. मागील दोन प्रयत्नात मी प्रिलीम परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. यावेळी सर्वच पातळ्यांवर मला यश मिळाले. माझे पहिले प्राधान्य आयएएस आहे, दुसरे प्राधान्य आयएफएस आहे. मला महाराष्ट्रात काम करायला मिळाले तर आवडेल. कारण मला इथली भाषा आणि संस्कृती माहिती आहे, असेही कश्मिराने नमूद केले.
Join Our WhatsApp Community