म्हाडाच्या मुंबई मंडळाच्यावतीने मुंबईतील ४,०८३ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून यासाठी २२ मे २०२३ पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी सोडत १८ जुलै २०२३ रोजी काढली जाणार आहे. मात्र, या लॉटरीमध्ये घरांच्या किंमती या खासगी विकासकांनी विक्री आणलेल्या सदनिकांच्या तुलनेतही अधिक आहे, शिवाय सर्वसामान्य गरीब जनतेच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे म्हाडाचे घर हे परवडणारे असल्याचे बोलले जात असले तरी या लॉटरीमधील घरांच्या किंमतींवर नजर टाकल्यास हे ‘न परवडणारे घर’ असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे या घरांच्या किंमती पाहता खरेच ही घरे सर्वसामान्य गरीब जनतेसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्थात ईडब्ल्यूएस वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंतची मर्यादा असून या गटातील घरांची किंमत २४.७१ लाख रुपये ते ४० लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वसामान्य गरिबांना ४० लाखांपर्यंतची घरे घेणे परवडणारे नाही. शिवाय अल्प उत्पन्न गटातील अर्थात एलआयजीमधील ९ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या गटात ३१ लाख ते १ कोटी ६१ लाखांपर्यंत घरांची किंमत आहे. त्यामुळे एलआयजीमधील गटातील दीड कोटींपर्यंतची घरे परवडणारी नाहीत. याशिवाय वार्षिक १२ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यम गटातील घरांच्या किंमती ४६ लाखांपासून ४ कोटी ७२ लाखांपर्यंत असल्याने ही घरे कोण खरेदी करणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे चारही उत्पन्न गटांमधील घरांच्या किंमती पाहता कोणत्याही व्यक्तीला ही घरे घेणे परवडणारे नसून म्हाडाने मुळ संकल्पनेला हरताळ फासल्याने या घरांच्या वाढत्या किंमतीचा फटका लॉटरीवर दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.
आजवर म्हाडाच्या घरांच्या किंमती या विभागातील रेडीरेकनरच्या दरापेक्षा कमी करून सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. परंतु यंदा या लॉटरीवर सरकारमधील मंत्र्यांचाही अंकूश नसल्याने रेडीरेकनरच्या दरानुसार या घरांच्या किंमती ठरवल्याने प्रत्यक्षात खासगी विकासकांनी विक्रीला आणलेल्या सदनिकांच्या किंमतीच्या बरोबरीत म्हाडाच्या या घरांच्या किंमती असल्याने म्हाडा आता परवडणारी घरे देणारे प्राधिकरण नसून ते आता विकासकाच्या भूमिकेत नफा मिळवणारी संस्था असल्याचे या लॉटरीवरून स्पष्ट होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांच्या लॉटरीला स्थगिती देऊन या निश्चित केलेल्या दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वसामान्यांचे गृहस्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल अशाप्रकारच्या भावना सर्वसामान्य गरीब जनतेकडून व्यक्त होताना दिसत आहे.
अशाप्रकारे आहेत घरांच्या सरासरी किंमती
- अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) : उत्पन्न मर्यादा ६ लाखांपर्यंत
- घरांची किंमत २४.७१ ते ४० लाख
- अल्प उत्पन्न गट (एलआयजी) : उत्पन्न मर्यादा वार्षिक ९ लाखांपर्यंत
- घरांची किंमत : ३१ लाख ते १ कोटी ६१ लाख रुपये
- मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) : उत्पन्न मर्यादा वार्षिक १२ लाखांपर्यंत
- घरांची किंमत : कमीत ४७ लाख ते जास्तीत जास्त ४ कोटी ७२ लाख रुपये
- उच्च उत्पन्न गट (एचआयजी) : कमाल मर्यादा नाही
- घरांची किंमत : कमीत कमी ८३ लाख ते ७ कोटी ५७ लाख रुपये