Book : पुस्तक आदानप्रदान सोहळ्यातून वाचन संस्कृती सक्षम करण्याचा प्रयत्न

पुस्तकांचा सेल्फी पॉईंट व पुस्तकांचे वृक्षांशी असलेले नाते त्या अनुषंगाने वृक्ष संवर्धनाचा संदेश या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात देण्यात आला.

159

पुस्तकांप्रमाणेच आजूबाजूची माणसं देखील वाचता आली पाहिजेत. तसेच आपला समाज, आपला देश वाचता आला पाहिजे, हे ज्याला जमलं तो माणूस जगण्यास लायक. खर्‍या अर्थाने पुस्तक आदान प्रदानचा जन्म इ. स. 1278 मध्ये यूरोपात झाला. ज्याने हे सुरु केले त्याचे नाव रिचर्ड डे बरी. तो धर्मगुरू, लेखक, ग्रंथ संग्राहक होता.आणि त्याचाच वारसा व्यास क्रिएशन्स पुढे चालवत आहेत.’

व्यास क्रिएशन्स आणि राज्ञी वेलफेअर असो. यांचे संयुक्त विद्यमाने सहयोग मंदिर, ठाणे येथे नुकताच 19 ते 21 मे असा तीन दिवसीय भव्य असा पुस्तक आदान प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उदघाटन ज्यांच्या हस्ते झाले ते ज्येष्ठ ग्रंथ संग्राहक, लेखक श्याम जोशी यांनी आपले वरील मनोगत व्यक्त केले. त्या तीन दिवसांमधल्या एकूण पाच सत्रात  तब्बल 41 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनात वेगवेगळी संकल्पना वापरून पुस्तक वाचनासाठी प्रेरणादायक वातावरण निर्माण करण्यात आले होते हे विशेष. 27900 पुस्तकांचे आदान प्रदान झाले. यावर्षीच्या आदान प्रदान महोत्सवात वय वर्ष 5 पासून ते वय वर्ष 93 पर्यंतच्या सर्व आबालवृद्धांनी पुस्तकांचे व त्या अनुषंगाने विचारांचे आदान प्रदान केले. विशेष निरीक्षण म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळ जवळ 40 टक्के इंग्रजी पुस्तकांचे आदान प्रदान झाले. त्यामध्ये तरुणाईचा मोठा प्रमाणात सहभाग होता.

vyas

यावेळी पुस्तकांचा सेल्फी पॉईंट व पुस्तकांचे वृक्षांशी असलेले नाते त्या अनुषंगाने वृक्ष संवर्धनाचा संदेश या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात देण्यात आला. प्रारंभी व्यासचे संचालक निलेश गायकवाड आणि राज्ञीच्या वैशाली गायकवाड यांनी या सोहळ्यामागची भूमिका उलगडून दाखवली. आपापल्या मनोगतातून अनेक लेखक, कवी, समीक्षक, कलावंत आणि ग्रंथप्रेमींनी पुस्तकं लिहिण्याचा प्रवास,अनुभूती,  त्यामागची भूमिका, संकल्पना, याविषयीचे आपले मौलिक विचार मांडले. खर्‍या अर्थाने विचारांचे आदान प्रदान झाले. पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रवीण दवणे म्हणाले, ‘नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी त्यासाठी हा आदान प्रदान हा एक संस्कार आहे.’ यावेळी ग्रंथप्रेमी डॉ. श्रीधर ठाकूर, लेखिका हर्षदा बोरकर हे उपस्थित होते.

(हेही वाचा upsc result : महाराष्ट्रातून किती जण झाले उत्तीर्ण; कोणत्या जिल्ह्यातील कोण आहेत यशवंत?)

गणेश वंदन व बालनाटिकेनंतर ज्येष्ठ लेखिका, समाजसेविका रेणुताई दांडेकर यांच्या 11 पुस्तकांचे तसेच दीपा जोशी, रश्मी जोशी यांच्याही प्रत्येकी एक एक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते झाले. दुसर्‍या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे ख्यातनाम शास्त्रीय गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे यांची लाभलेली उपस्थिती. त्या म्हणाल्या, ‘माझं सारं जीवन हे संगीताभोवती फिरते, संगीताने मला माणसं दिली, शाश्वत ज्ञान दिले. मुलांवर चांगले संस्कार होतील या दृष्टीने बाल वाङ्मय तयार झाले पाहिजे.’ त्यांचे हस्ते इंदिरा अत्रे, मधुकर लेले, भारती मेहता यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखक प्रा. अशोक चिटणीस, श्रीराम बोरकर आणि डॉ अनंत देशमुख उपस्थित होते. दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन चांगलेच रंगले, बहरले. यामध्ये 16 कवींना सहभाग घेऊन आपल्या काव्या प्रतिभेचा आनंद उपस्थित रसिकाना दिला. तर संध्याकाळच्या सत्रात सदानंद राणे, शिबानी जोशी, सुमन नवलकर आणि प्रियंवदा करंडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मा पद्मा हुशिंग आणि लेखक, नाटककार अभिराम भडकमकर यांचे हस्ते झाले. ते म्हणाले, ‘एखादी संध्याकाळ एन्जॉय करण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो, परंतु आयुष्याची संध्याकाळ संस्मरणीय करायची असेल तर पुस्तक खरेदीला पर्याय नाही.’

शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात रसिका मेंगळे, कल्पना मलये आणि रमेश सावंत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, अभिनेत्री संध्या म्हात्रे, लेखिका मेघना साने, डॉ. विजया पंडितराव, कथाकार किरण येले आणि कवयित्री, समीक्षक प्रतिभा सराफ यांचे हस्ते झाले. दुपारच्या सत्रात ‘पुस्तकवल्ली हा अभिवाचनाचा आगळावेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला. तर संध्याकाळच्या सत्रात कवी, चित्रकार रामदास खरे, अनुसूया कुंभार, लीला शहा, एकनाथ आव्हाड आणि मेधा रानडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन लेखक, समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ कवी डॉ र म शेजवलकर आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक, संगीत नाटक अकादमी विजेते कुमार सोहनी यांचे हस्ते झाले. या तीनही दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय नेटकं आणि खुमासदारपणे करणार्‍या धनश्री प्रधान-दामले यांचा विशेष उल्लेख करावाच लागेल. व्यासचे संचालक नीलेश गायकवाड यांनी पुढील वर्षीच्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवाची घोषणा करून संपूर्ण तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या समस्त वाचक रसिकांचे, ग्रंथप्रेमींचे, मान्यवरांचे आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.