MHADA Lottery 2023: मासिक ५० हजार पगार घेणाऱ्यालाही म्हाडाचे अत्यल्प गटातील घर घेणं परवडणार नाही

530
मासिक ५० हजार पगार घेणाऱ्यालाही म्हाडाचे अत्यल्प गटातील घर घेणं परवडणार नाही
मासिक ५० हजार पगार घेणाऱ्यालाही म्हाडाचे अत्यल्प गटातील घर घेणं परवडणार नाही

सचिन धानजी, मुंबई

मुंबई म्हाडा मंडळाच्यावतीने ४०८३ सदनिकांसाठी लॉटरी सोडत जाहीर केली असून यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी तब्बल २७९० सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांची किंमत ३० ते ४० लाख रुपये एवढी आहे. परंतु या सदनिकांसाठी लॉटरीमध्ये यशस्वी ठरल्यास लाभार्थ्याची बँकेतून कर्ज घेताना मोठी दमछाक होणार आहे. किमान मासिक २५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला १३ लाख रुपयांपर्यंतच कर्ज प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जर ३० लाखांपर्यंतच्या सदनिकेसाठी यशस्वी ठरणाऱ्या लाभार्थ्याला मुद्रांक शुल्कासह सुमारे २० लाखांपर्यंतची करावी लागणार आहे. त्यामुळे पगारांवरच अवलंबून असणाऱ्या आणि गाठीशी चार पैसे नसणाऱ्या परंतु म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकाला या घराच्या वाढत्या किंमतीमुळे आपल्या गृह स्वप्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्यावतीने ४०८३ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून यासाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सोमवारी २२ मे २०२३ पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये वार्षिक सहा लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या म्हणजेच महिन्याला सरासरी ५० हजारापर्यंत पगार असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यल्प उत्पन्न गटात घरे राखीव ठेवण्यात आली आहे. या सोडतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ४०५३ सदनिकांपैंकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९० घरे राखीव आहे. यातील वडाळा सीजीएस कॉलनीतील घरांची किंमत ४० लाख रुपये असून गोरेगाव पहाडी येथील घरांची किंमत ३० लाख ४४ हजार एवढी आहे. तर विक्रोळी कन्नमवारमधील घरांची किंमत ३४ ते ३६ लाख रुपये एवढी आहे. तर विखुरलेल्या दोन घरांचा समावेश आहे. त्यामध्ये चांदिवलीमध्ये एक आणि मानखुर्दमध्ये एका घरांचा समावेश आहे. या घरांची किंमत अनुक्रमे २५ आणि २६ लाख रुपये एवढी आहे.

त्यामुळे ५० हजार पगार असणाऱ्या व्यक्तीला ओढून ताणून २९ लाख रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतरही त्याला मुद्रांक शुल्क व इतर बाबींसाठी ५ ते १२ लाख रुपयांची जमवाजमव करावी लागणार आहे. तर २० ते २५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला १० ते १३ रुपयांचे बँकेतून कर्ज मिळू शकते. त्यामुळे पहाडी गोरेगाव येथील घरासाठी पात्र ठरल्यानंतरही लाभार्थ्याला २० ते २५ लाख रुपयांची जमवाजमव करावी लागणार आहे. त्यामुळे ही रक्कम सर्वसामान्य गरीब माणूस कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित होत असून ज्या व्यक्तीच्या मागे आर्थिक सक्षम व्यक्ती असेल अशीच व्यक्ती हे म्हाडाचे घर घेऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हे घर खरेदीच करू शकत नसल्याने या उत्पन्न गटामध्ये बसणाऱ्या व्यक्तीला कर्जाव्यतिरिक्त इतरची रक्कम नातेवाईक व आप्त मंडळींकडून प्राप्त झालीच तर ते हे घर खरेदी करु शकतात. त्यामुळे या घरांच्या किंमतीमध्ये परवडणाऱ्या घरांच्या संकल्पनेचा हेतू साध्य होत नसून शेवटी म्हाडाची घरे ही सर्वसामान्य गरीब जनतेला आणि जे मुंबईत येवू पाहत आहेत त्यांना घेता येणार नाही. त्यामुळे पर्यायाने आर्थिक सक्षम असणारी व्यक्तीच एक गुंतवणूक या घरांची खरेदी करू शकते आणि आर्थिक सक्षम असलेले आई वडिलही मुलांसाठी घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न या म्हाडाच्या लॉटरीद्वारे करणार आहे. परंतु ज्या गरीबाला आज घर नाही त्याला हे घर परवडणारे नसल्याने तसेच कर्ज मिळू न शकल्याने त्याला या म्हाडाच्या घरावर पाणी सोडून पर्यायाने मुंबईत राहण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Mhada Lottery : म्हाडाच्या घरांसाठी दुसऱ्या दिवशी ४,२३६ अर्ज)

बँकेतून किती पगारावर किती मिळू शकते कर्ज

  • २० हजार पगार : कर्ज १० लाख ४४ हजार रुपये
  • २५ हजार पगार : कर्ज १३ लाख रुपये
  • ५० हजार पगार : कर्ज २९ लाख रुपये

म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी सदनिका आणि त्याची किंमत

योजना क्रमांक (४१२) पहाडी, गोरेगाव पश्चिम : (१९४७ सदनिका)

  • सदनिकेची  किंमत : ३० लाख ४४ हजार रुपये
  • अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : १०, ५९०

योजना क्रमांक (४१३) वडाळा अँटॉपहिल सीजीएस कॉलनी : (४१७ सदनिका)

  • सदनिकेची  किंमत : ४० लाख रुपये
  • अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५, ५९०

योजना क्रमांक (४१४) विक्रोळी कन्नमवार नगर: (१६६ सदनिका)

  • सदनिकेची  किंमत :  ३४ लाख ७४ हजार रुपये
  • अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५, ५९०

योजना क्रमांक (४१५) विक्रोळी कन्नमवार नगर: (२५८सदनिका)

  • सदनिकेची  किंमत : ३६ लाख १६ हजार रुपये
  • अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५, ५९०

योजना क्रमांक (९१ सी)  चांदिवली मुंबई: (०१सदनिका)

  • सदनिकेची  किंमत : २४ लाख ७१ हजार ७३३ रुपये
  • अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५, ५९० रुपये

योजना क्रमांक (३६४ ए)  मानखुर्द मुंबई: (०१ सदनिका)

  • सदनिकेची  किंमत : २६ लाख  २६ हजार २५४ रुपये
  • अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५, ५९०

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.