पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मे रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. ऍडमिरल्टी हाऊस येथे आगमन झाल्यावर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि मानवंदना देण्यात आली.
उभय नेत्यांनी मार्च २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेचे स्मरण केले आणि बहुआयामी भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, नवी आणि नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, महत्त्वपूर्ण खनिजे, शिक्षण, स्थलांतर आणि गतिशीलता आणि दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंध या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
उभय नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी व्यवस्था (एमएमपीए) वर स्वाक्षरी करण्यात आल्याचे स्वागत केले. खास भारतीयांसाठी तयार करण्यात आलेल्या MATES (प्रतिभावंत उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी गतिशीलता व्यवस्था योजना) या नवीन कौशल्य योजनेबरोबरच एमएमपीए या व्यवस्थेमुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधक, शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रातील लोकांची गतिशीलता अधिक सुलभ करेल.
(हेही वाचा – PM Modi : पॅसिफिक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी मोदींचे प्रयत्न)
त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया हायड्रोजन कृती दलाच्या संदर्भ अटींना अंतिम रूप देण्यात आल्याचे स्वागत केले. हे कृती दल हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स, फ्युएल सेल्सवर लक्ष केंद्रित करून तसेच पायाभूत सुविधा आणि मानके व नियमांच्या सहाय्याने स्वच्छ हायड्रोजनचे उत्पादन आणि वापराला गती देण्याबाबत सूचना करेल.
पंतप्रधान मोदी यांनी ब्रिस्बेनमध्ये भारताचे महावाणिज्य दूतावास स्थापन करण्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या सहाय्याबद्दल आभार मानले.
उभय नेत्यांनी नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आधारावर एक शांततापूर्ण, समृद्ध आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र सुनिश्चित करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणांवरही त्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान अल्बानीज यांनी भारताच्या G-20 अध्यक्षपद आणि उपक्रमांना ऑस्ट्रेलियाचा भक्कम पाठिंबा दर्शवला. सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान अल्बानीज यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान उत्सुक आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community