मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना दप्तर, पाण्याची बॉटल आणि खाऊचा डबा आदींऐवजी पैशांचे वाटप केले होते. परंतु यंदा ही रक्कम न देता या वस्तूंचे वाटप मुलांना केले जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी महापालिका शाळांमधील मुलांना कमीत कमी ५१० आणि जास्तीत जास्त ७६० रुपये इयत्तेनुसार पैशांचे वाटप केले होते. परंतु आता कमीत कमी ४८२ रुपये ते ७४० रुपयांमध्ये दप्तर, पाण्याची बॉटल आणि खाऊचा डबा दिला जाणार आहे.
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय २००७मध्ये घेण्यात आल्यानंतर तेव्हापासून मुलांना या वस्तूंचे वाटप केले जात आहे. परंतु मागील वर्षी निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने या शालेय वस्तूंच्या खरेदीचे प्रस्ताव १७ जून २०२२ पासून मंजूर करण्यात आले. त्यामुळे मुलांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला होता.
त्यामुळे मुलांना छत्रीसह दप्तर, पाण्याची बॉटल व खाऊचा डबा आदी वस्तू न देता त्यासाठीचे पैसे मुख्याध्यापकांमार्फत मुलांना वाटप करून या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रथम मुलांना छत्री ऐवजी पैसे दिल्यानंतर प्रशासनाने दप्तर, पाण्याची बॉटल व खाऊचा डबा आदी वस्तूंऐवजी पैसे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
(हेही वाचा Gyanvapi Case : ‘औरंगजेब क्रूरही नव्हता ना त्याने विश्वेश्वराचे मंदिर तोडले…’, मशीद समितीचा न्यायालयात दावा)
यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्तेतील मुलांना प्रत्येकी ५१० रुपये, इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी प्रत्येकी ६२० रुपये आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी ७६० रुपये एवढी रक्कम देण्यात आली होती. मुख्याध्यापकांच्या खात्यात ही रक्कम जमा करून मुलांना या वस्तू पुरवण्यात आल्या होत्या.
परंतु मागील वर्षी या वस्तूंचे पैसे दिले असले तरी यावर्षी या वस्तूंच्या वाटपासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्ता पर्यंतच्या मुलांसाठी या वस्तूंच्या खर्चासाठी प्रत्येकी ४८३. ६२ रुपये खर्च केले जाणार आहे. तर इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी प्रत्येकी ६१५ रुपये तर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी प्रत्येकी प्रत्येकी ७४० रुपये एवढा खर्च या वस्तूंच्या खरेदीकरता येणार आहे. या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सर्वस्य मर्चडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी निविदेत पात्र ठरली असून या वस्तूंच्या खरेदीसाठी २० कोटी ०३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे शालेय वस्तूंच्या खरेदीमध्ये आजवर या वस्तूंच्या खरेदीसाठी कामे देण्यात आलेल्या गुणिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड आणि जीव्हीटी ग्लोबल इंडस्ट्रीज या कंपन्या मागे पडल्या असून सर्वस्य मर्चडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे काम मिळवले आहे. यामध्ये मुलांना २९० ते ४४४ रुपयांपर्यंतचे दप्तर दिले जाणार आहे, तर १९३ ते २९६ रुपयांपर्यंत खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली दिली जाणार आहे.
मुलांना दप्तर, बॉटल आणि खाऊचा डब्बा या वस्तूंसाठी होणारा खर्च
- पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्ता( एकूण मुले १, १२,९२८) : खर्च प्रत्येकी ४८३. ०२ रुपये
- इयत्ता तिसरी ते सातवी ( एकूण मुले १, ७३,७५५): खर्च प्रत्येकी ६१५ रुपये
- इयत्ता आठवी ते दहावी( एकूण मुले ७४,२५३) : खर्च प्रत्येकी ७४० रुपये