Mhada : जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राअभावी अनेक लाभार्थी म्हाडाच्या घरांसाठी लटकले

म्हाडाच्या पत्रानंतर आरक्षण प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या अर्जदारांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राची आठवण झाली असून प्रत्येकाने आता  हे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे.

286

म्हाडाच्या घरांसाठी बऱ्याच अर्जदारांनी आरक्षणामध्ये अर्ज केला असून आजवर केवळ जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज भरुन निवांत राहिलेल्या अर्जदारांना प्रत्यक्षात या लॉटरी सोडतीत यशस्वी ठरल्यानंतर मात्र जातीच्या दाखल्याच्या वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. म्हाडाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ताबा पत्राची प्रक्रिया राबवताना पाठवलेल्या पत्रांमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तसेच म्हाडाने दिलेल्या कालावधीमध्ये ते सादर करू न शकल्याने बऱ्याच लाभार्थ्यांना घराच्या हक्कावरच पाणी सोडावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने ४०८३ घरांसाठी ऑनलाईन घर खरेदीकरता लॉटरी सोडत जाहीर केली आहे. या लॉटरीमध्ये भाग घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक आहे,अशाप्रकारची अट घातली आहे. याच प्रकारच्या अटींचा सामावेश कोंकण मंडळाच्यावतीने काढलेल्या २०२१ लॉटरी सोडतीतील लाभार्थी तसेच यावर्षी विरारमधील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य तसेच आता २०२३मध्ये काढलेल्या लॉटरीत यशस्वी ठरलेल्या लाभार्थ्यांना म्हाडाचा घरांसाठी अर्ज केल्यानंतर जात प्रमाणपत्राचे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र न मिळवल्याने म्हाडाच्या पत्रानंतर ते जागे होत त्यांनी आता वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी धावपळ सुरु केली आहे.

(हेही वाचा Gyanvapi Case : ‘औरंगजेब क्रूरही नव्हता ना त्याने विश्वेश्वराचे मंदिर तोडले…’, मशीद समितीचा न्यायालयात दावा)

म्हाडाच्या पत्रानंतर आरक्षण प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या अर्जदारांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राची आठवण झाली असून प्रत्येकाने आता  हे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे. आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या यशस्वी अर्जदाराला म्हाडाने पत्र पाठवून १५ दिवसांमध्ये या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे कळवले आहे. त्यामुळे बऱ्याच अर्जदारांनी यासाठी केलेल्या अर्जाच्या पावतीवर पुढील प्रक्रिया सुरु केली असली तरी प्रत्यक्षात म्हाडाने निश्चित केलेल्या दिवसांमध्ये हे वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास या घराचा ताबा हातचा जाण्याची शक्यता आहे. जातीच्या दाखल्याच्या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक ते तीन महिने किंवा त्या पेक्षा जास्त कालावधी जात असल्याने म्हाडाला १५ दिवसांमध्ये हे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मोठ्या अडचणींचा सामना लाभार्थ्याला करावा लागू शकतो. कोकण मंडळाच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या ताबा प्रक्रियेमध्ये अशाच प्रकारची प्रकरणे समोर येत असून कोकण मंडळाने जाहिरातीने अशाप्रकारच्या अटींचा स्पष्ट उल्लेख केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांनी वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी म्हाडाच्या पत्रानंतर अर्ज केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे म्हाडाच्या ४०८३ घरांसाठी आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केल्यानंतर जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज करून याबाबतचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात म्हाडाचे घर घेताना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना यशस्वी अर्जदारांना करावा लागणार नाही,असे बोलले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.