शहर भागातील नाले आणि मिठी नदीची सफाई अपूर्ण, तरीही महापालिका प्रशासन म्हणतेय १०० टक्के सफाई झाली म्हणून…

156
शहर भागातील नाले आणि मिठी नदीची सफाई अपूर्ण, तरीही महापालिका प्रशासन म्हणतेय १०० टक्के सफाई झाली म्हणून...
शहर भागातील नाले आणि मिठी नदीची सफाई अपूर्ण, तरीही महापालिका प्रशासन म्हणतेय १०० टक्के सफाई झाली म्हणून...
मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याचे निश्चित उद्दिष्ट मुदतीपूर्वीच गाठले गेल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. पैकी, गुरुवार म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार आतापर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मे २०२३ रोजीच्या ठरवलेल्या मुदतीच्या एक आठवड्यापूर्वीच गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शहर भागातील नाल्यांची सफाई ९४ टक्के आणि मिठी नदीची सफाई ९० टक्के झाली आहे, तरीही महापालिका प्रशासनाचा १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. गाळ काढण्याच्या कामांना दिनांक ६ मार्च २०२३ रोजी प्रारंभ करण्यात आला होता. तर, काम पूर्ण करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२३ ठरवली होती. या विहित मुदतीपूर्वीच नाल्‍यातून गाळ काढण्‍याचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आता नाल्यात जरी गाळ दिसला तरी शंभर टक्के सफाई झाली असा समज करून घेत मुंबईकरांनी या कामांकडे दुर्लक्ष करायला हवा.
गाळ काढण्याची सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी यंत्रणेला दिले होते. त्यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. उद्दिष्ट गाठले गेले असले तरी त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम यापुढेही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले यांनी दिली आहे.
गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्थींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफित (व्हिडिओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक केले आहे. काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे. असे छायाचित्रण व चित्रफित तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणा-या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणा-या – जाणा-या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून करुन घेण्यात येत आहे.
नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी आतापर्यंत वाहनांच्या ५१ हजार ४९० फेऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

आतापर्यंत काढण्यात आलेल्या गाळाबाबतचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

१)  शहर विभाग- ३७ हजार ९४६ मेट्रिक उद्दिष्ट/ पैकी ३५ हजार ७५६ मेट्रिक टन गाळ काढला. (हे प्रमाण ९४.२३ टक्‍के आहे.)
२) पूर्व उपनगरे- १ लाख १७ हजार ६९२ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी १ लाख १९ हजार ३५९ मेट्रिक टन गाळ काढला. (हे प्रमाण १०१.४२ टक्‍के आहे.)
३) पश्चिम उपनगरे- १ लाख ९३ हजार ९३३ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी १ लाख ९४ हजार ६२२ मेट्रिक टन गाळ काढला.( हे प्रमाण १००.३६ टक्‍के आहे.)
४) मिठी नदी- २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी, आतापर्यंत १ लाख ९५ हजार ५६६ मेट्रिक टन गाळ काढला. (हे प्रमाण ९०.४७ टक्‍के आहे.)
५) लहान नाले- ३ लाख ६५ हजार ६३३ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी,  ३ लाख ८५ हजार ६४४ मेट्रिक टन गाळ काढला. (हे प्रमाण १०५.४७ टक्‍के आहे.)
६) महामार्गांलगतचे नाले- एकूण ४८ हजार ५०२ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी, ५३ हजार ९७७ मेट्रिक टन गाळ काढला. (हे प्रमाण १११.२९ टक्‍के आहे.)
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.