मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे प्रशिक्षित ३५ ‘आपदा सखी’ आणि २३ ‘आपदा मित्र’; यानुसार एकूण ५८ स्वयंसेवकांनी मुंबईत झालेल्या ‘जी-२०’ गटाच्या तीन दिवसीय बैठकीदरम्यान अतिशय उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्य केल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिनिधींसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर, ‘जी-२०’ कार्य गटाच्या संचालिका मृणालिनी श्रीवास्तव यांनी काढले. त्याच बरोबर ‘जी-२०’ कार्य गटाच्या बैठकीसाठी देश विदेशातून आलेल्या सर्वच प्रतिनिधींनी ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ या महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने यशस्वीपणे राबविलेल्या संकल्पनेचे कौतुक करतानाच ‘स्वयंसेवक’ म्हणून सहभागी झालेल्या सर्वच ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखींनी केलेल्या कामांची वाखाणणी केली.
याबाबत अधिक माहिती देताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सांगितले की, ‘जी-२०’ गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा आपल्या भारताला मिळालेला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर ‘जी-२०’ देशांच्या कार्य गटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ मे ते २५ मे २०२३ यादरम्यान वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील ‘जिओ कन्व्हेन्शन सेंटर’ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ‘जी-२०’ सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र संघाचे आणि भारत सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत वास्तव्यास असताना या सर्व मान्यवर प्रतिनिधींची व्यवस्था अधिकाधिक चांगली व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे प्रशिक्षण देण्यात आलेल्या ५८ ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या सर्व ५८ स्वयंसेवकांना टप्पेनिहाय पद्धतीने विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले होते.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेत ६६४ अभियंत्यांची पदे भरणार; लवकरच प्रकाशित होणार जाहिरात)
समन्वय अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी
तर स्वयंसेवकांनी बजाविलेल्या कामगिरी बद्दल माहिती देताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी सांगितले की, सर्व स्वयंसेवकांना ‘समन्वय अधिकारी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. देश विदेशातून आलेल्या प्रतिनिधींच्या आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत हे स्वयंसेवक प्रतिनिधींच्या सहकार्यासाठी उपस्थित होते. या अंतर्गत सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हे स्वयंसेवक अविरतपणे कार्यरत होते. आलेल्या पाहुण्यांना काय हवे नको ते बघणे, पाहुण्यांना मुंबई बद्दल माहिती देणे, विविध ठिकाणी त्यांना वेळेत घेऊन जाणे इत्यादी विविध कार्य या स्वयंसेवकांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली.
एक हजार मुंबईकरांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राद्वारे तब्बल १ हजार मुंबईकर युवक व युवतींना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण केंद्राचे राजेंद्र लोखंडे यांनी समन्वय साधून आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन विषयक विविध प्रात्यक्षिकांचाही समावेश होता. ज्यामध्ये प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे धडे प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह देण्यात आले. या अंतर्गत प्रामुख्याने विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा ‘सीपीआर’ अर्थात ‘कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन’ म्हणजेच हृदयाचे पुनरुत्थान करणे, पूरपरिस्थितीत बचाव व शोध कार्य करणे यासारख्या विविध बाबींचा समावेश होता.
(हेही वाचा – शनिवार आणि रविवारी लोअर परेल, वरळी ते माहिम, धारावीपर्यंतच्या भागातील पाणीपुरवठा बंद)
त्याचबरोबर आगीची घटना घडू नये किंवा विविध स्वरुपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी; एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेत करावयाचे मदतकार्य याबाबतही अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवतींना ‘आपदा सखी’ असल्याचे; तर युवकांना ‘आपदा मित्र’ असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकतील अशा विविध वस्तूंचा एक संच देखील या सर्व प्रशिक्षणार्थींना देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community