Metro Rail : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोच्या संचलन आणि देखभालीचे कंत्राट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे

या कराराचा कालावधी दहा वर्ष असून याअंतर्गत डीएमआरसी मेट्रो-३ च्या दैनंदिन संचलन व देखभालीसाठी जबाबदार असेल.

157

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (मुं.मे.रे.कॉ.) मुंबईतील पहिल्या पूर्णतः भूमिगत असलेल्या मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) च्या संचलन आणि देखभालीचे कंत्राट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (डीएमआरसी) देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर हे कंत्राट त्यांना देण्यात आले. डीएमआरसीने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट मिळवले.

मेट्रो-३ मार्गाच्या कार्यान्वयनासाठी संचलन आणि देखभाली साठी हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील मेट्रो रेल्वे क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या डीएमआरसीने दोन दशकांहून अधिक काळ दिल्ली मेट्रो अंतर्गत विविध मेट्रो मार्गांचे यशस्वी संचलन (operation) व देखभाल (maintenance) केली आहे.

या कराराचा कालावधी दहा वर्ष असून याअंतर्गत डीएमआरसी मेट्रो-३ च्या दैनंदिन संचलन व देखभालीसाठी जबाबदार असेल. याशिवाय संचलन नियंत्रण केंद्रे (Operation control centre), डेपो नियंत्रण केंद्र (Depot Control Centre) व स्थानके यांचे व्यवस्थापन तसेच सर्व गाड्या व मेट्रो प्रणालीच्या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे याचीही जबाबदारी डीएमआरसीकडे असेल. मुंबईकरांना स्वच्छ, कार्यक्षम आणि आरामदायी सेवा सुनिश्चित करण्यासाठी ते मुख्य कार्यप्रदर्शन निर्देशका (Key Performance Indicators) द्वारे नियंत्रित करतील.

(हेही वाचा IPL 2023 : GT चा गिल आणि MI चा सूर्यावर विश्वास; नरेंद्र मोदी स्टेडिअम दोघांसाठी भारी)

दरम्यान, मुं.मे.रे.कॉ. नेहमीप्रमाणेच मेट्रो रेल्वे प्राधिकरण म्हणून कर्तव्य पार पाडेल. तसेच मुं.मे.रे.कॉ. ही महसूल व्यवस्थापन, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, व्यवसाय व ब्रँड व्यवस्थापन, जनसंपर्क, कायदेविषयक बाबी, नॉन-फेअर बॉक्स महसूल (Non-Fare Box Revenue) निर्मिती, सेवा कर्ज, देयके आणि नियामक मंडळांशी समन्वय यासाठी जबाबदार असेल.

परवडणाऱ्या दरात, आरामदायक प्रवास

“मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे संचलन आणि देखभाल करण्यासाठी निवडण्यात आलेली डीएमआरसी ही देशातील अग्रगण्य मेट्रो ऑपरेटिंग कंपन्यांपैकी एक आहे. डीएमआरसी सारख्या कंपनीसोबत काम करणे आनंदाची बाब आहे. कोणत्याही मेट्रोसाठी संचलन आणि देखरेख हा महत्त्वाचा घटक असतो. मुं.मे.रे.कॉ. मध्ये आम्ही प्रवाशांना परवडणाऱ्या दरात, आरामदायक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची सेवा देण्यास कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.