Veer Savarkar Jayanti 2023 : इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर

वीर सावरकर ह्यांचे ठाम मत होते, जे देशवासीय जागरूकपणे आपल्या इतिहासाची माहिती करून घेत नाहीत, त्यांचे भविष्य हे अंधारमय आहे. देशाने आपल्या इतिहासाची चोख माहिती ठेवावी परंतु, पूर्व इतिहासाचे गुलाम होऊ नये.

213
  • प्रवीण दीक्षित

अनेक इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना इतिहासकार समजण्यास नाखूश असतात. परंतु सुप्रसिद्ध रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई एकदा वीर सावरकर ह्यांना मुद्दाम भेटायला गेले असतांना त्यांनी सांगितले की, ‘सावरकर, आपण इतिहासातील घटनांची जंत्री देणारे नसून आपण इतिहास निर्माण करणारे आहात.’ वीर सावरकर ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांना भारत सोडायला लावण्यात महान कारवाई तर केलीच पण त्याशिवाय वसाहतवादी इंग्रज आणि इतर युरोपियन तसेच इंग्रजांच्या प्रोत्साहनाने स्वतःला इतिहासकार म्हणविणाऱ्या पण खऱ्या इतिहासाची पूर्वग्रहदूषित मांडणी करणाऱ्या भारतीय व तत्सम अन्य तज्ज्ञांचेही दावे हे सत्यावर आधारीत नाहीत हे सप्रमाण दाखवून दिले.

वीर सावरकर ह्यांचे ठाम मत होते, जे देशवासीय जागरूकपणे आपल्या इतिहासाची माहिती करून घेत नाहीत, त्यांचे भविष्य हे अंधारमय आहे. देशाने आपल्या इतिहासाची चोख माहिती ठेवावी परंतु, पूर्व इतिहासाचे गुलाम होऊ नये. वीर सावरकरांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस मोगलांचा विरोध हा त्या वेळेप्रमाणे न्याय्य व योग्य होता. परंतु तीच भावना आज कायम ठेवणे हे अयोग्य आणि वेडेपणाचे होईल.

(हेही वाचा Veer Savarkar : अंश तू माझा, वंश तू माझा…स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार स्वीकारताना भावविभोर झाल्या हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंच्या आई)

वीर सावरकरांनी त्यांच्या काळात असलेले इतिहासाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी संशोधन करून व अत्यंत परखडपणे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताचा खरा इतिहास लोकांपुढे ठेवला. वीर सावरकर आपल्या प्रत्येक लिखाणात प्रभावीपणे सांगतात, ‘इतिहासाच्या तीन सहस्र वर्षात प्रबळ राजकीय शत्रूंवर हिंदू राष्ट्राने वारंवार विजय मिळवून ‘हिंदू हे गुलाम रहायलाच योग्य आहेत’ हा अपसमज दूर केला. अलेक्झांडरच्या यावनी सैन्याने हिंदुस्थानवर स्वारी केली त्यावेळेस त्यांना दाती तृण धरायला लावून हिंदुकुश पर्यंत पिटाळून लावले. प्रलयकारी हूणांच्या हल्ल्यात रोमन साम्राज्याचा चक्काचूर होऊन गेला पण त्याच हूणांना हिंदू राष्ट्राने पूर्णपणे नाहिसे करून टाकले. त्यानंतर आलेल्या शक, कुशाणांच्या बरोबर चाललेल्या तीन शतकांच्या युद्धात शेवटी शक, कुशाण कोण होते ते प्रदर्शनात दाखवण्यापुरते सुद्धा उरले नाहीत. पुढे मुसलमानांच्या हल्ल्यामध्ये सारे भारतवर्ष मुस्लिमांनी ग्रासून टाकले. पण वीर सावरकर सप्रमाण दाखवून देतात की, जसे राहू सूर्यास ग्रासतो तसे केवळ ग्रहणकाळापुरते संधी मिळताच हिंदूंनी मसलमानांना ‘दे माय धरणी ठाय’ केले. मोगली तख्ताच्या ठिकऱ्या उडविल्या. व सर्वात शेवटी ज्या समुद्रातून ब्रिटिश भारतावर चढून आले त्या समुद्रातच त्यांच्या साम्राज्य सत्तेला भारताने बुडवून टाकले. वीर सावकर आग्रहाने सांगतात, ‘Survival of the fittest – आम्ही हिंदू श्रेष्ठतम होतो म्हणून, जगावयास योग्य ठरलो.’’

वीर सावरकर ह्यांनी सप्रमाण दाखवून दिले, हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी मराठ्यांनी, भारताच्या सर्व भागांमध्ये चढाई केली व तिथे न्यायावर आधारित प्रशासन निर्मिती केली. अनेक इतिहासकारांनी मराठ्यांना पेंढारी, लुटारू म्हणून संबोधले परंतु, हे धादांत खोटे होते. आजही इंग्रज इतिहासकारांच्यावर विश्वास ठेऊन 1857 मध्ये केवळ शिपायांचे बंड झाले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकजण करत असतात परंतु, 1857 मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध झालेले ते स्वातंत्र्यसमर होते हे अनेक इंग्रज इतिहासकारांच्याच पुस्तकांतून व तथ्यांच्या आधारे दाखवत अत्यंत कोवळ्या वयाच्या वीर सावरकरांनी अतुलनीय असे काम केलेले आहे. ह्या त्यांच्या लिखाणामुळे भारतातील सर्व ठिकाणच्या तरुणांमध्ये, विचारवंतांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व ‘पूर्व दिव्य ज्यांचे, रम्य त्यांना भाविकाळ’ ह्यावर वीर सावरकरांनी शिक्कामोर्तब केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजच्या स्मृतिदिनी त्यांच्या या द्रष्टेपणाला विनम्र अभिवादन!

(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.