Veer Savarkar Jayanti 2023 : सावरकर आणि भाषाशुद्धी

परकीय आक्रमणानंतरही पहिल्यांदाच यादव राजांच्या राज्यात राजाश्रय मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशात मराठी भाषेतील उर्दू आणि फारशी शब्दांना बदलून स्वकीय शब्दांद्वारे भाषाशुद्धीच्या प्रयत्न केला होता, हीच चळवळ सावरकरांनी पुढे नेली, ते साल होते १९२४.

307
  • पूजा बागडे

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी…

इंग्रजी भाषेच्या प्रभावात मराठी भाषा टिकेल का? मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत. मराठी चित्रपटांना, नाटकांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे, अशा चर्चा अनेक वर्षांपासून आपण ऐकत आहोत, वाचत आहोत. शब्दसंपत्ती भरपूर असलेल्या आपल्या मातृभाषेत आज अनेक परकीय शब्द शिरले आहेत. ‘यू नो, सो, सॉरी, प्लिज’ यांसारखे असंख्य इंग्रजी शब्द, मराठी भाषा बोलताना सहज वापरले जातात. हल्लीच्या मराठी वृत्तपत्रातून, मराठी वाहिन्यांवरील मालिकांमधून अकारण इंग्रजी शब्द वापरले जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेला आपला पाल्य, घरात मराठी भाषा बोलत नाही, असे कौतुकाने सांगणारे अनेक पालक आढळतात. अशा परिस्थितीत मराठी भाषा जगेल का? तिचं महत्व कमी कमी होत जाऊन कालांतराने ती विस्मरणात जाईल इतकी का ती तकलादू आहे?

परकीय आक्रमणानंतरही पहिल्यांदाच यादव राजांच्या राज्यात राजाश्रय मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशात मराठी भाषेतील उर्दू आणि फारशी शब्दांना बदलून स्वकीय शब्दांद्वारे भाषाशुद्धीच्या प्रयत्न केला होता, हीच चळवळ सावरकरांनी पुढे नेली, ते साल होते १९२४.

१९२४ ते १९३७ ह्या स्थानबद्धतेच्या कालावधीत सावरकरांनी जी विविध कार्ये हाती घेतली होती, त्यात ‘भाषेचे शुद्धीकरण’ आणि नागरी लिपिशुद्धीचे आंदोलन ह्या चळवळींचे महत्व आहे. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांना जेव्हा ‘जनरल लायब्रऱ्या’ किंवा ‘रिडींग रूम’ ह्या संस्थानाच्या वतीने मानपत्रे देण्यात येत, तेव्हा ते, ही नावे बहिष्कारून त्या संस्थानांना ‘वाचनालय, ग्रंथालय, पुस्तकालय, अशी स्वकीय नावे ठेवा असे आवर्जून सांगत.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर : राष्ट्रवाद ते मानवतावाद…)

मराठीत ६ हजारांहून अधिक पाने, आणि १५०० हून अधिक पाने इंग्रजी साहित्यात लिहिणारे सावरकर ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ हे स्वातंत्र्यदेवीचं स्तवनगीत किंवा सागरा प्राण तळमळला… या पलीकडे सावरकर पोहचू शकले नाही किंवा पोहचू दिले गेले नाहीत. स्तोत्र, आरत्या, कविता, महाकाव्य, गीत, लेख, नाटक, चरित्र, इतिहास संशोधन, समाज प्रबोधन, जातीउच्छेदन, स्पुटक असे साहित्यातले सर्व प्रकार त्यांनी हाताळले.

स्वतः सावरकरांनी १९२६ मध्ये मराठी भाषेचे शुद्धीकरण नावाची एक पुस्तिका लिहिली होती, त्यात शिक्षणविषय – शाळा, प्राध्यापक, प्रबोधिका, मुख्याधापक, प्राचार्य, महाविद्यालय. धंदेविषयक – विधिज्ञ, केशकर्तनालय, औषधालय, भोजन निवास गृह, धुलाई केंद्र. सभाविषयक – परिपत्रक, ध्वनी निर्देशक, ध्वनिवर्धक, अहवाल, अमर हो, प्रकट, प्रतिवृत, निर्बंध. संसदविषयक – विधी, विधिमंडळ, स्पर्धक, अर्थसंकल्प, विभाग, निर्वाह विभाग, न्यायविभाग, कार्यवाही. चित्रपट विषयक – पटगृहं, चित्रपट, मूकपट, बोलपट, मध्यंतर, कलामंदिर, छात्रिक, परिचयपट, संकलन. टपालविषयक – टपाल, ध्वनी, दूरमुद्रक, वस्तू टपाल, पटांकन असे अनेक प्रतिशब्द सावरकरांनी दिले. त्यावेळी त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. सावरकरांच्या भाषाशुद्धीची टवाळी करणारे त्याकाळीसुद्धा होते आणि आजही आहेत. आपल्या मातृभाषेत शब्दसंग्रह भरपूर असताना परकीय शब्द आत्मसात करणे याला सावरकर स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करून, त्यांची हेडसाळ करून दुसऱ्याची मुले दत्तक घेणे म्हणतात. प्रतिशब्द निर्माण करताना, भाषा समृद्ध करणे हा एकमेव हेतू सावरकरांचा होता. सावरकर हे स्वतः शब्दप्रभू होते. १९३८ मध्ये अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी भाषाशुद्धी बद्दल आग्रही मत मांडले. आज त्यांनीच रूढ केलेले दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलक, चित्रपट आदी अनेक शब्द आपण सर्रास वापरतो, पण त्याचे जनक सावरकर आहेत, हे बऱ्याच लोकांना ठाऊकही नसते. १९८५-८८ सुमारास महाराष्ट्र शासनाच्या पुस्तक प्रकाशन विभागाने सावरकरांचे भाषाशुद्धी हे पुस्तक, बाळाराव सावरकरांच्या परवानगीने छापून प्रसिद्धही केले होते.

सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळी अंतर्गत मराठी भाषेत घुसलेल्या परकीय शब्दांना नवे शब्द प्रचलित करून जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन केलेच, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी देवनागरी लिपीत सुधारणाही केली. सावरकरांच्या काळी पुस्तके छापण्यासाठी छापखान्यात अक्षरांचे टंक वापरले जात. संपूर्ण लिपीसाठी किमान दोनशे टंक लागत, म्हणून बाराखडीत क, ख,ग प्रमाणेच अ ची बाराखडी स्वीकारून इ, ई, उ, ऊ, ए, ऐ इत्यादी सहा अक्षरे कमी करून नवी लिपी सुद्धा तयार केली. त्यामुळे टंक कमी लागून वेळ वाचू लागला.

यंदा स्वातंत्र्यवीरांची १४०वी जयंती आहे. राज्यभर सावरकर गौरव यात्रा निघत आहेत. सावरकर विचार जागर साप्ताह साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांच्या जयंती दिवशी भारताच्या नव्या संसदेचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. भारताची भविष्यकालीन वाटचाल सावरकर विचारांवर आधारित असेल याचेच हे द्योतक आहे, आणि हीच खरी त्यांना मानवंदना आहे. ‘इतिहासातून वळून पाहसी पाठीमागे जरा, झुकून मस्तक करशील त्यांना मनाचा मुजरा’!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.