फुले म्हटलं की सर्वात आधी तुमच्या मनात काय येत? त्यांचा सुगंध आणि आकर्षक रंग होय ना? पण तुम्हाला माहिती आहे का, या जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे सुगंध नव्हे तर दुर्गंधी येणारी फुले होय. वाचून आश्चर्य वाटतं ना, पण हे खरंय. या जगात फक्त सुगंधच नाही तर दुर्गंध येणारी फुलेही आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच दुर्गंधी फुलांविषयी सांगणार आहोत. चला तर मग ती कोणती फुले आहेत ते जाणून घेऊयात.
हाईडनोरा आफ्रिकाना
ही मांसल फुले दक्षिण आफ्रिकेत आढळतात. या फुलांतून मलासारखी दुर्गंधी येते. हे एक परजीवी झाड आहे. हे झाड फुल उमलण्याव्यतिरिक्त इतर सर्वकाळ भूमीगतच असते. हे झाड एक फळ तयार करते तेही भूमीगतच असते. ते फळ पिकण्यासाठी दोन वर्षे एवढा कालावधी लागतो. या फळाचा आकार आणि चव दोन्ही बटाट्यासारखे असतात. या उभयलिंगी फुलांच्या कळ्या पूर्णपणे भूमीगतच विकसित होतात. कळ्या पूर्ण विकसित झाल्यानंतर 100 ते 159 mm एवढ्याच वर येतात. या फुलांचा रंग बाहेर करडा आणि आतमध्ये चमकदार नारंगी असतो.
ड्रॅकुनकुलस वल्गरिस
अरेशियाई जातीची ही फुले मुख्यत्त्वे ग्रीसमध्ये पाहायला मिळतात. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा पश्चिम घाट आणि वॉशिंग्टन येथेही ही फुलं सापडतात. तर कॅनडा येथील ऑंटारियो प्रांतातही ही फुले उगवली जातात. या फुलांतून सडक्या मांसाचा दुर्गंध येतो. पण नशीब की, हा दुर्गंध जास्त काळ टिकत नाही. एका दिवसातच निघून जातो. या फुलाच्या झाडाचा प्रत्येक अवयव विषारी असतो. याला स्टिंक लीली, ड्रॅगन अरुम आणि स्नेक लीली या नावांनीही ओळखले जाते.
(हेही वाचा Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग जरी वेगवान असला, तरी…’ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला सल्ला )
बल्बोफाईलम फेलेनोप्सीस
ही फुले पापुआ न्यू गिनी येथे सापडतात. या फुलांच्या मध्यभागी बारीक फुलांचा समूह असतो जो मांसासारखा दिसतो. या फुलांतून मेलेल्या उंदरासारखी दुर्गंधी येते.
रॅफलेसिया अर्नोल्डी
ही फुले इंडोनेशियातील वर्षावनामध्ये सापडतात. हे जगातल्या मोठ्या फुलांपैकी एक आहे. या फुलांची उंची 3 फुटांपर्यंत वाढते आणि वजन 15 पौंड इतके असते. हे परजीवी फुल आहे. या फुलांना कोणतीही पाने किंवा मुळे दिसत नाहीत. ही फुले कोणत्याही पोषक झाडांवर जगतात. ही फुले उमलल्यानंतर यातून सडलेल्या मांसाच्या दुर्गंधीसारखा वास येतो. तरीही हे इंडोनेशियातील तीन राष्ट्रीय फुलांपैकी एक आहे, हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
टायटन अरुम (शवपुष्प)
जगातले सर्वात मोठे फुल त्याप्रमाणेच जगातले सर्वात जास्त घाणेरड्या वासाचे फुल म्हणून हे फुल ओळखले जाते. सुमात्रा येथील वर्षावनामध्ये ही फुले आढळतात. या फुलांचा वास सडलेल्या प्रेतासारखा असतो. म्हणूनच याला शवपुष्प देखील म्हणतात. भारतात केरळ येथे हे फुल उगवले होते. हे फुल चार ते सहा वर्षांमध्ये एकदाच उमलते ते फक्त चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठीच. या फुलांची लांबी 10 ते 12 फुटांपर्यंत तर व्यास 5 फुटांपर्यंत असतो.
Join Our WhatsApp Community