Veer Savarkar Jayanti 2023: भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे भीष्म पितामह स्वातंत्र्यवीर सावरकर!

193
भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे भीष्म पितामह स्वातंत्र्यवीर सावरकर!
भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे भीष्म पितामह स्वातंत्र्यवीर सावरकर!

विनायक ढेरे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या भक्तांनी अंदमान आणि काव्य या दोन ‘कोठड्यांमध्ये’ कोंडून ठेवले आहे, तर वीर सावरकरांच्या काँग्रेसी विरोधकांनी त्यांना माफीनाम्याच्या ‘कोठडीत’ कोंडले आहे. पण वीर सावरकर हे या दोन्ही पलीकडचे विशाल राजकीय, सामाजिक आणि सामरिक व्यक्तीमत्व आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक, सामरिक तत्त्वज्ञान आणि धोरणे वास्तवावर आधारित असण्याबरोबरच शक्ती संपन्न भारतासाठी भविष्यवेधी ठरणारी होती, म्हणूनच आज वीर सावरकर भारतीय राजनीतीच्या दृष्टीने ‘द मोस्ट रेलेव्हंट पॉलिटिकल थिंकर’ ठरतात.

1947 ते 1960 या भारतीय शांतता धोरणाच्या भ्रमजालाच्या पार्श्वभूमीवर वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारण अर्थात परराष्ट्र धोरण कठोर वेगळेपणाने उठून दिसते.

आजच्या परराष्ट्र धोरणाचा पाया

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे परराष्ट्र धोरण आजच्या मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा पाया म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. किंबहुना ते अधिक वास्तववादी आणि काळाशी सुसंगत ठरेल. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वीर सावरकरांना ‘फादर ऑफ इंडियन नॅशनल सिक्युरिटी’ असे संबोधले, त्यामध्ये त्यांच्याविषयीच्या भक्तिभावापेक्षा वास्तववाद अधिक आहे. कारण वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील एकूण धोरणच त्याला पूरक आणि अनुषंगिक होते.

हिंदू सैनिकीकरण

1940 च्या दशकात भारतीय स्वातंत्र्य जवळ येत होते, तेव्हा वीर सावरकरांनी भारतीयांसाठी आखलेले हिंदूंचे सैनिकीकरण धोरण आजच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाची गंगोत्री मानली पाहिजे. कारण वीर सावरकरांनी जेव्हा हिंदूंचे सैनिकीकरण हा विषय सुरू केला, त्यावेळी ब्रिटिश भारतीय सैन्यात मुस्लिमांचे प्रमाण 60 % च्या वर होते. ते हिंदू सैनिकीकरण केल्यानंतर अवघ्या चार वर्षांत 70 % – 30 % असे झाले.

भारत – चीन – जपान पूर्व आघाडी

इतकेच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्कालीन महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांच्या मित्र राष्ट्रांच्या विरोधात अर्थात पाश्चात्य शक्तींविरोधात भारत, चीन आणि जपान अशी पूर्वेकडच्या देशांची प्रबळ ‘पूर्व आघाडी’ उभारण्याची सूचना केली होती. यातला चीन हा माओ झेडाँगचा कम्युनिस्ट चीन नव्हता, तर चंग कै शेक यांचा राष्ट्रवादी चीन होता, हे इथे अधोरेखित केले पाहिजे. अन्यथा वीर सावरकरांच्या ‘पूर्व आघाडी’बाबत गैरसमज होऊ शकतो. शिवाय चीनने आपले विस्तारवादी धोरण सुरू करण्यापूर्वीची ही सूचना होती हे सांगणेही इथे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वीर सावरकरांना भारत हा चीनपेक्षा प्रबळ असणे अपेक्षित होते, ही बाब देखील तितकीच किंबहुना सर्वाधिक महत्त्वाची आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti : वीर सावरकर जयंतीनिमित्त पर्यटन विभागाच्या पुढाकारातून ‘भव्य पदयात्रा’)

भ्रमक शांततावादाला छेद

वीर सावरकरांनी परराष्ट्र नीतीची जी सूत्रे सांगितली, ती पंडित नेहरूंच्या तथाकथित पंचशील आणि शांततावादाला छेद देणारी होती हे उघड आहे. पण ती अधिक वास्तववादी आणि भारतीय दृष्टिकोनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक ठसा उमटवणारी होती, हे देखील तितकेच स्पष्ट आहे. त्यामुळेच त्यांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, अशी मैत्रीची सूचना केली होती. या धोरणातूनच ते हिटलरच्या जर्मनीला शत्रू न मानता ब्रिटिशांच्या विरोधापुरते मित्र मानत होते आणि हेच वीर सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अर्थात परराष्ट्र धोरणाचे तत्कालीन संदर्भातले वेगळे वैशिष्ट्य ठरले होते.

भ्रामक तत्त्वज्ञानाला विरोध

भारताने स्वातंत्र्य नजीक येताना अमेरिकेशी व्यापारी संबंध वाढविले पाहिजेत, इतकेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्या संदर्भातले करार केले पाहिजेत, हा वीर सावरकरांचा आग्रह होता. त्यात उगाच भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद या तथाकथित तात्विक वादाला त्यांनी महत्त्व दिलेले नव्हते.

त्याउलट भारत कोणत्याही स्थितीत प्रबळ व्हावा यासाठी त्यांनी अमेरिकेकडून शस्त्र खरेदीस अथवा अणू तंत्रज्ञान आत्मसात करण्यास विरोध करण्याऐवजी थेट पाठिंबा दिला होता. किंबहुना भारताने अणूशक्ती संपन्न झाले पाहिजे हे वीर सावरकरांचे प्रतिपादन पंडित नेहरूंच्या अणूशक्ती धोरणाच्या आधीचे होते.

अणूशक्ती पुरवठादार देश

‘शांततेसाठी अणू’ हे धोरण वरवर पाहता कितीही आकर्षक आणि जागतिक शांततेचा पुरस्कार करणारे वाटत असले, तरी आज भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेल्यानंतरही जेव्हा भारत अणू पुरवठादार देशांच्या पंक्तीत बसण्यास धडपडतो आहे, तेव्हा वीर सावरकरांची भारत अणूशक्ती बनण्याची सूचना किती मोलाची होती, हे दिसून येते!! पण ती सूचना त्यावेळी मान्य झाली नव्हती. त्या ऐवजी तत्कालीन नेहरू सरकारने 1954 मध्ये कॅनडाशी करार करून भारताला अणूशक्ती बनण्याचे पहिले पाऊल उचलले होते. पण त्यात भारत अणुबॉम्ब बनवणार नाही, ही अट भारतीय संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाला सर्वार्थाने घातक ठरली होती. आणि वीर सावरकरांचा नेमका याच ‘शांततेसाठी अणू’ या धोरणाला ठाम विरोध होता.

त्या उलट भारत अणूशक्ती संपन्न म्हणजे अणू बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब शक्तीसंपन्न देश व्हावा, हा त्यांचा आग्रह होता. मग वीर सावरकर विरोधी विचारवंत त्यांना कितीही युद्धखोर अथवा शांतता विरोधी ठरवोत, वीर सावरकरांचे ते धोरणच आजच्या भारताला अणू तंत्रज्ञान निर्यात करण्यायोग्य असलेल्या देशांच्या पंक्तीत बसविण्यास अचूक ठरले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.