संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शनिवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चांगला समाचार घेतला. ज्यांना लोकसभेत येण्याची परवानगी नाही असे लोक संसदेच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालत आहेत, अशा शब्दात ठाकूर यांनी राहुल गांधी यांना कोपरखळी मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळातील उपलब्धींवर प्रकाश टाकण्यासाठी दूरदर्शनने दिल्लीत राष्ट्रीय संमेलन भरविले होते. यात बोलताना माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘भारताला ‘लोकशाहीची जननी’ म्हटले जाते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत दिली आहे’.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. विरोधी पक्षांनी यावर बहिष्कार घातला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या नवीन इमारतीचे उद्घाटन व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. या मुद्यावर त्यांनी बहिष्कार घातला आहे. मात्र, असे अनेक विरोधी पक्ष आहेत जे भाजपचे मित्र पक्ष नाहीत. हे पक्ष उद्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – Central Vista : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसदेचे उदघाट्न रविवारी)
दरम्यान, बहिष्कारावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. काही लोकांना संसदेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. एकेकाळी ते सभागृह चालू नये यासाठी निमित्त शोधायचे. आता तेच लोक बहिष्कार घालत आहेत. मुळात हा संसदेचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, नवीन संसद भवन हे स्वतंत्र भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. संसदेची नवीन इमारत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या लोकांच्या संकल्पाचे प्रतिनिधित्व करते. नवीन संसद भवन हा स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. ते केवळ एक वास्तुशिल्पीय उपकरण नाही. तर भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. संसदेची नवीन इमारत भारतीय जनतेला समर्पित आहे. नवीन संसद आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक आहे आणि १.४ अब्ज भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते, असेही नड्डा यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community