भायखळ्यातील एका गेस्टहाऊसमध्ये थांबलेल्या पेरू देशातील नागरिक असलेल्या महिलेची गेस्टहाऊसच्या कर्मचाऱ्याने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याच्या १२ तासांच्या आत पोलिसांनी गेस्टहाऊसच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. रविवारी, २८ मे रोजी आरोपीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नक्की काय घडले?
भायखळा पूर्व या ठिकाणी असलेल्या वेलकम गेस्टहाऊसमध्ये पेरू देशातील ३८ वर्षीय पर्यटक महिलेने खोली बुक केली होती. बुक केलेल्या खोलीत परदेशी महिला एकटीच राहत होती. या गेस्टहाऊसमध्ये काम करणारा रियाज अहमद राजू अहमद (१९) हा शुक्रवारी गेस्टहाऊसमध्ये रात्रपाळीला कामाला होता. दरम्यान रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रियाज हा या महिलेच्या खोलीवर गेला व तिच्याशी गप्पा मारू लागला. दरम्यान त्याने तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिला विनंती केली. मग तिने त्याला होकार देताच त्याने त्याच्या मोबाईल फोन मधून सेल्फी काढत असताना तिच्या शरीराला स्पर्श करू लागला व तिच्याशी लगट करू लागला. परदेशी महिलेने त्याला दूर लोटले, त्यानंतर देखील तो तिच्या जवळ गेला व बळजबरीने तिच्यासोबत लगत करण्याचा प्रयत्न करीत असताना या महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे गेस्टहाऊस मधील इतर कर्मचारी आणि गेस्ट धावत खोलीजवळ आले. या कर्मचाऱ्याच्या तावडीतून तिची सुटका करून भायखळा पोलिसांना कळवले. दरम्यान या रियाज या कर्मचाऱ्याने गेस्टहाऊसमधून पळ काढला. पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी त्याच्या मागावर गेले असता तो उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान भायखळा पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीवरून रियाज अहमद याचा विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून रियाजला अटक करण्यात आली आहे, रविवारी त्याला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community