पार्सल पोहोचवताना महिलांचे मोबाईल खेचून पळणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. या झोमॅटो बॉयकडून पोलिसांनी ४ महागडे मोबाईल फोन जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या झोमॅटो बॉय हा मागील काही महिन्यांपासून मोबाईल चोरीचे गुन्हे करीत असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबईत ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नदीम नसीम अख्तर खान (३०) असे अटक करण्यात आलेल्या झोमॅटो बॉयचे नाव असून तो गोवंडी येथील बैंगन वाडी येथे राहण्यास आहे. ६ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून लग्नानंतर तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करीत होता.
छत्तीसगड येथे राहणाऱ्या पल्लवी भन्साळी या मुंबईत नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. २४ मे रोजी त्या नातेवाईकांना भेटून श्रीआयव्हीएफ क्लिनिकच्या समोर, एम जी रोड, घाटकोपर पूर्व येथून पायी जात असताना त्याच्या हातातील मोबाईल फोन मोटारसायकलवरून आलेल्या एकाने खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गेस्टहाऊसच्या कर्मचाऱ्याला अटक)
टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल वाघमारे, पो.उप.नि पोर्णिमा हांडे, पो.ह. शिंदे, साटेलकर, रोंगटे या पथकाने परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता झोमॅटो डिलेव्हरी बॉयने ही चोरी केल्याचे समोर आले. दरम्यान एक डिलिव्हरी बॉय गोवंडी येथील हायपर किचन या ठिकाणी एक पार्सल घेऊन जात असताना दिसून आला त्यावेळी तेवढ्या वेळात किती पार्सलची डिलिव्हरी कुठल्या डिलिव्हरी बॉयच्या मार्फत झाली याचा तपास करून चार संशयित डिलिव्हरी बॉयची नावे समोर आली. तपास पथकाने सर्वांची फेसबुक, व्हॉट्सअप प्रोफाइल तपासणी केली असता नदीम खान याचा प्रोफाइल फोटो घटनास्थळी मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधील फोटोशी जुळले. तपास पथकाने नदीम यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन मिळवून त्याला गोवंडी पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलीस ठाणे आणून त्याच्याजवळ गुन्ह्याची चौकशी केली असता पल्लवी भन्साळी यांचा मोबाईल फोन त्यानेच चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
या गुन्ह्यात नदीमला अटक करून पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीचे चार मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. नदीम हा सराईत चोर असून त्याच्याविरुद्ध या पूर्वीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका गुन्ह्यात त्याला अटक झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर पडला होता. त्यानंतर काही महिने त्याने चोरीचे गुन्हे सोडून दिले होते. तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाल्यानंतर पुन्हा त्याने चोरीचा मार्ग पत्करला आणि जेवणाची डिलिव्हरी करता करता तो महिलांना लक्ष करून मोबाईल फोन चोरी करीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community