वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर केंद्राचे राज्याला पत्र… सुनावले खडे बोल!

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत धोक्याची सूचना दिली आहे. 

223

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत तर ही परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. असे असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचे, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुनावले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत धोक्याची सूचना दिली आहे.

कठोर पावले उचलण्याची गरज

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दोन पत्रं लिहीत, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेला सुरुवात होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने कठोर आणि परिणामकारक नियोजन धोरणावर लक्ष केंद्रित करुन, त्यासाठी योजना आखणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले आहे.

भविष्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा

केंद्रीय पथकाच्या अहवालावर आधारित महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रात भूषण यांनी, महामारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून राज्य सरकार करत असलेल्या नाईट कर्फ्यू आणि विकएंड लॅाकडाऊनचा फार कमी परिणाम संसर्ग रोखण्यासाठी होत असल्याचे म्हटले आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या चाचण्या, विलगीकरण या सगळ्याच बाबतीत राज्य सरकारचे प्रयत्न फारच मर्यादित स्वरुपाचे आहेत, तसेच ग्रामीण व शहरी भागांत नियमांचे कोटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला जात नसल्याचे केंद्रीय पथकाच्या अहवालात समोर आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने भविष्यात येणा-या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी स्पष्ट ताकीद भूषण यांनी पत्राद्वारे सीताराम कुंटे यांना दिली आहे.

(हेही वाचाः राज्यात कोरोनाचे नवे निर्बंध! जाणून घ्या!)

काय आहेत उपाययोजना?

देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रात आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे, त्या जिल्हयांत ही मोहीम अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देणे गरजेचे आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणा-या २० ते ३० लोकांना त्वरित शोधून त्यांची चाचणी करणे आवश्यक असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

रुग्णसंख्येत सतत वाढ

गेल्या एका महिन्यात राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १७१.५ टक्क्यांनी वाढली आहे. ११ फेब्रुवारी रोजी ३६ हजार ९१७ इतकी असणारी संख्या ११ मार्च रोजी १ लाख २४० इतकी वाढली आहे, त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय संघाने असे अनुमान लावले की, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ज्याप्रमाणे कोरोना रोखण्यासाठी कार्यरत करण्यात आली होती त्याचप्रमाणे आताही ती यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः गुजरातमध्ये कोरोना रुग्ण वाढले… उरलेल्या सामन्यांत प्रेक्षकांना प्रवेश नाही!)

लसीकरणात शिथिलता

दुसऱ्या पत्रात बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, झोपडपट्ट्या, दाटवस्ती असलेला भाग या सर्व ठिकाणी विविध झोन निर्माण करण्याचा सल्ला दिल्याचंही म्हटलं आहे. राज्यातील लसीकरण प्रक्रियेतील शिथिलतेवर सुद्धा केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. केंद्राने आधी ५४.१७ लाख लसींचे डोस राज्य सरकारला दिले असून, १८ मार्चपर्यंत आणखी १२.७४ लाख डोस पाठवले जातील. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध असूनही १२ मार्चपर्यंत केवळ २३.१८ लाख लोकांनाच लस देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही शिथिलता कमी करुन वेग वाढवण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.