मुंबईतील वांद्रे- वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात केली.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शत जन्म शोधितांना…’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबईतील तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना महापुरुषांची नावे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. फडणवीसांच्या मागणीनुसार, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
Join Our WhatsApp Community