पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी दहावी नापास विद्यार्थ्यांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. टीईटीनंतर (TET) राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जात आहे. या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती. या रॅकेटचा मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचा असून कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, छत्रपती संभाजी नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत अल्ताफ शेख (रा. परांडा जी.धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
यातील मुख्य समजल्या जाणाऱ्या कृष्णा गिरी याने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पब्लिक स्कूल नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तो पास झाल्याचे प्रमाणपत्र देत होता. यासाठी त्याने एक कार्यालय देखील सुरू केले होते. मुलांच्या ऍडमिशनसाठी तो सोशल मीडियावरून प्रचार देखील करायचा. मात्र आता याच कृष्णा गिरीला पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांनी आतपर्यंत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे आरोपी ‘अलहिंद विद्यापीठ’ ही अस्तित्वात नसलेली विद्यापीठ वेबसाईट तयार करुन या माध्यमातून नापास असलेल्या विद्यार्थ्यांना ३० ते ५० हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देत होते. हा प्रकार २०१९ पासून सुरु होता.
(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर)
Join Our WhatsApp Community