राज्यभरातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसमधून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. येत्या दोन आणि तीन जून रोजी काँग्रेसच्या वतीने सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची ही बैठक होत आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातही काँग्रेसची चाचपणी होणार आहे. यामुळेच आता महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होत आहे का, अशी चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेस पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष आणि काही महत्त्वाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक लोकसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे. त्या ठिकाणी काँग्रेसची असलेली ताकद याची देखील चाचपणी केली जाणार आहे आणि यानंतर तिथे असलेले ताकदवर उमेदवार यांची यादी करत याचा एक विस्तृत रिपोर्ट तयार केला जाणारा असून पुढे महाविकास आघाडीच्या बैठकीत याचा आधार घेत जागांची मागणी केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community