मुंबई महापालिका शाळांमध्ये आतापर्यंत हजेरी पुस्तकावरच असलेली विद्यार्थ्यांची नोंद आता अद्ययावत केली जाणार असून वर्ग शिक्षकांबरोबरच आता या विद्यार्थ्यांची सर्व कुंडली थेट मुख्याध्यापकांच्या हाती राहणार आहे. महापालिका शाळांसाठी शालेय विभागाच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित केली जाणार आहे. याचे नियंत्रण थेट प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हाती राहणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक एका क्लिकवर शाळांमधील मुलांसह उपलब्ध असलेली साधनसामुग्री आणि इमारतींमधील सुविधांची माहिती जाणू घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी शिक्षकांना किंवा लिपिकांना बोलावून माहिती जाणून घेणारे मुख्याध्यापक आता स्वत:च अपडेट राहून स्वावलंबी बनणार आहे
सुमारे ९६ लाख रुपये खर्च येणार!
मुंबई महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १,१५० शाळांमधील मुख्याध्यापक कार्यालयांकरता माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या प्रणालीसाठी, तसेच त्यांची जोडणीसह वापरण्याकरता योग्य प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या कंत्राट कामासाठी प्रोबिट प्लस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ९६ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
(हेही वाचा : कारवाईचा बडगा दाखवताच २८ वर्षांचा मालमत्ता कर वसूल!)
आवश्यक माहिती वरिष्ठ स्तरावर उपलब्ध करून देणे सोपे जाणार!
महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत शाळांच्या कार्यालयीन कार्यात एकरुपतेसाठी तसेच शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्प तसेच उपक्रम यांच्या योग्य उपयोगितेसाठी व शिक्षण विभागातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, इमारती व इतर आवश्यक माहितीचे आज्ञावलीच्या माध्यमातून एकत्रिकरण करण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जाणार असल्याचे महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रणालीमुळे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातील उपविभागांमध्ये अशा प्रकारची आज्ञावली प्रणाली दिल्यामुळे दैनंदिन कार्यालयात एकरुपता येईल व अन्य आवश्यक माहिती वरिष्ठ स्तरावर उपलब्ध करून देणे सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट होईल.
Join Our WhatsApp Community