दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बीए (ऑनर्स) राज्यशास्त्र अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. आता याविषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेसमोर मांडण्यात येणार आहे. त्यापूर्वीच याचे सर्व क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनीही याचे स्वागत केले आहे. या अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करताना वीर सावरकर शिकण्याची संधी मिळणार आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.
काय आहे दिल्ली विद्यापीठाचा निर्णय?
दिल्ली विद्यापीठाच्या बीए (ऑनर्स) राज्यशास्त्र अभ्यासक्रमात एकूण ११ धडे आहेत. त्यात राजा राममोहन रॉय, पंडिता रमाबाई, स्वामी विवेकानंद, गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींवरील धडे आहेत. पूर्वी पाचव्या सत्रात गांधीजींवरील पेपर होता आणि सहाव्या सत्रामध्ये डॉ. आंबेडकरांवर पेपर होता. आता विद्यापीठाने यामध्ये वीर सावरकरांवर पेपर आणला आहे. त्याचवेळी कवी महंमद इक्बाल यांच्यावरील धडा वगळण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय दिल्ली विद्यापीठाची कार्यकारी परिषद घेणार आहे.
(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर)
काय म्हणाले रणजित सावरकर?
दिल्ली विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वागत केले आहे. याविषयावर प्रतिक्रिया देताना रणजित सावरकर म्हणाले की, दिल्ली विद्यापीठाची कृती अभिनंदनीय आहे. कारण वीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक, देशभक्त, समाजसुधारक, वक्ता किंवा लेखक नाहीत, ते राजकीय परिस्थितीचे उत्तम अभ्यासक होते. आजच्या परिस्थितीचे मुल्यमापन इतिहासाच्या दृष्टिकोनातून करून उद्या भविष्यात काय घडू शकेल याबद्दल त्यांचे अंदाज नेहमीच अचूक ठरलेले आहेत. भविष्यात काय होईल याविषयी त्यांनी अनेकदा देशाला अवगत केले होते. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्याला फाळणीसह अनेक संकटांचा सामना करावा लागला. ते परराष्ट्र धोरणाविषयी देखील तज्ज्ञ होते.
दोन देशांमधील संबंध हे त्यांच्या आपापसातील हितसंबंधावरच आधारित असले पाहिजेत, ते समोरच्या देशाची राजकीय विचारधारा काय आहे, यावर असू नयेत, असे वीर सावरकर म्हणाले होते. त्यावरही ६५ वर्षांत लक्ष दिले गेले नाही. मात्र मागील १० वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण वीर सावरकर यांच्या विचारधारेनुसार चालत आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत. त्यामुळे मी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांना राज्यशात्र विषयाचा अभ्यास करताना वीर सावरकर शिकण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सावरकर आणि गांधी यांचा राजकीय विषयावर तुलनात्मक अभ्यास केला तर त्यांचे राज्यशास्त्राचे आकलन निश्चितच सुस्पष्ट होईल. विद्यार्थ्यांना ही संधी दिल्याबद्दल मी दिल्ली विद्यापीठाचा आभारी आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community