सध्या धान्य दुकानात वापरात असलेल्या जुन्या टू-जी ई-पॉस मशीनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी रेशन दुकानदाराकडून सातत्याने करण्यात येत होत्या.
या तक्रारींची दखल घेत आता पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना लवकरच फोरजी ई -पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेत गतिमानता येणार आहे. लाभार्थ्यांना आता तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या वाट्याचे रेशन तत्काळ मिळणार आहे.
१ मे २०१८ पासून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण केले जात आहे. मात्र, याकरिता असलेल्या ई- पॉस मशिनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे त्वरित थंब इम्प्रेशन होत नव्हते. एका शिधापत्रिका धारकाला १० ते १५ मिनिटे वेळ द्यावा लागत होता. अनेक ई-पॉस मशीन मधील सीम कार्ड निरुपयोगी झाले असून, रेशन दुकानदारांना मोबाइलद्वारे हॉट स्पॉट वापरून धान्य वितरण करावे लागत होते. मशीन मधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधा वाटप करताना अडचणी आल्या. या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात आता टूजीऐवजी फोरजी ई-पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात धान्य वितरणातील विस्कळीतपणामुळे अनेकदा वादही होतात. त्यामुळे आता रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणींवर आता मात करता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांची होणारी धान्य घेण्यासाठी गर्दी आणि लांबच लांब रांग आता काही अंशी कमी होणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी होईल, असे पुरवठा विभागाने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community